ICC T20 World Cup Prize Money: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या स्पर्धेतील फायनलचा सामना ८ मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत २ वेळा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. त्यामुळे भारतीय संघाकडे विजयाची हॅट्रिक करण्याची संधी असणार आहे. तर न्यूझीलंडचा संघ पहिलं जेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान वर्ल्डकप विजेत्या संघाला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळणार? जाणून घ्या.
वर्ल्डकप विजेत्या बक्षीस म्हणून किती रक्कम मिळणार?
आयसीसीकडून टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेसाठी एकूण १३.५ मिलियन डॉलर्स (१२३.७७ कोटी) बक्षीसाची रक्कम जाहीर केली आहे. ही रक्कम टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील बक्षिसेच्या रकमेच्या तुलनेत २० टक्के अधिक आहे. गेल्यावेळी बक्षिसाची रक्कम ही ११.२५ मिलियन डॉलर्स इतकी होती. या स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपदाचा मान पटकावला होता. या स्पर्धेत भारतीय संघाला बक्षीस म्हणून २.४५ मिलियन डॉलर्स इतकी रक्कम मिळाली होती. तर उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला बक्षीस म्हणून १.२८ मिलियन डॉलर्स इतकी रक्कम मिळाली होती.
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील विजेत्या संघाला ३ मिलियन डॉलर्स म्हणजे २७.५० कोटी इतकी रक्कम दिली जाणार आहे. तर निर्णायक सामना गमावणाऱ्या उपविजेत्या संघाला १.६ मिलियन डॉलर्स म्हणजे १४.६७ कोटी रूपये दिले जाणार आहेत. तर सेमी फायनलमध्ये पराभूत होणाऱ्या संघाला ०.७९ मिलियन डॉलर्स म्हणजेच ७.२४ कोटी रूपये दिले जाणार आहेत.
या स्पर्धेतील विजेत्या उप विजेत्या संघासह स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला रक्कम दिली जाणार आहे. या स्पर्धेतील ५ ते १२ व्या स्थानी असलेल्या संघांना देखील ०.३८ मिलियन डॉलर्स म्हणजे ३.४८ कोटी रूपये दिले जाणार आहेत. तर १३ ते २० व्या स्थानी असलेल्या संघांना ०.२५ मिलियन डॉलर्स म्हणजे २.२९ कोटी रूपये दिले जाणार आहेत. त्यामुळे एकही संघ रिकाम्या हाती परतणार नाही. सर्व २० संघांना आयसीसीकडून मानधन दिलं जाणार आहे. आता पहिलं बक्षीस कोण पटकावणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
