टी२० वर्ल्डकप स्पर्धेत आज रात्री भारत आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने उभे ठाकणार आहेत. या दोन संघांमध्ये टी२० वर्ल्डकप स्पर्धेत ४ लढती झाल्या असून यापैकी भारताने २ तर इंग्लंडने २ जिंकल्या आहेत. भारतीय संघ स्पर्धेत अपराजित आहे तर इंग्लंडने संघर्षमय वाटचाल करत सेमी फायनल फेरी गाठली आहे. टी२० वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडच्याविरुद्धच्या मुकाबल्यात भारताकडून शेवटची विकेट कोणी काढलेय तुम्हाला माहितेय का? यासाठी जरा इतिहासात डोकावूया. पहिल्यावहिल्या टी२० वर्ल्डकपमध्ये डरबान इथे झालेल्या मुकाबल्यात भारतीय संघाने १८ धावांनी विजय मिळवला. हा सामना युवराज सिंगने गाजवला. युवराजने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहाही चेंडूवर षटकार लगावत विक्रम प्रस्थापित केला. युवराजने अवघ्या १२ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. युवराजने या सामन्यात १६ चेंडूत ५८ धावांची अविश्वसनीय खेळी साकारली. गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग जोडीने १३६ धावांची खणखणीत सलामी दिली. सेहवाग ५२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ६८ धावांची खेळी केली. पाठोपाठ गंभीरही तंबूत परतला. त्याने ४१ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ५८ धावा केल्या. रॉबिन उथप्पा आणि महेंद्रसिंग धोनी मोठ्या खेळी करू शकले नाहीत. युवराजने मात्र सहा षटकारांसह सामन्याचं चित्रच पालटवलं. भारतीय संघाने २१८ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडने हार न मानता दोनशे धावांची मजल मारली. विक्रम सोलंकीने ४३ तर केव्हिन पीटरसनने ३९ धावा केल्या. भारताकडून इरफान पठाणने ३ तर आरपी सिंगने २ विकेट्स घेतल्या. युवराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. दोन वर्षांनंतर झालेल्या उत्कंठावर्धक लढतीत इंग्लंडने ३ धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १५३ धावा केल्या. भारतीय संघाने दीडशे धावा केल्या. इंग्लंडतर्फे केव्हिन पीटरसनने ४६ तर रवी बोपाराने ३७ धावांची खेळी केली. भारताकडून हरभजन सिंगने ३ तर रवींद्र जडेजाने २ विकेट्स पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय संघाने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. युसुफ पठाणने ३३ तर महेंद्रसिंग धोनीने ३० धावांची खेळी केली. इंग्लंडतर्फे रेयान साईडबॉटम आणि ग्रॅमी स्वान यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. दोन वर्षांपूर्वी अॅडलेड इथे झालेल्या मुकाबल्यात इंग्लंडने भारताचा १० विकेट्सनी धुव्वा उडवला. भारतीय संघाने हार्दिक पंड्या आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या बळावर १६८ धावांची मजल मारली. हार्दिकने ३३ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ६३ धावांची खेळी केली. कोहलीने ४० चेंडूत ५० धावा केल्या. इंग्लंडतर्फे ख्रिस जॉर्डनने ३ विकेट्स पटकावल्या. जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. कर्णधार बटलरने ४९ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ८० धावांची तडाखेबंद खेळी साकारली. अॅलेक्स हेल्सने ४७ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ८६ धावांची मॅरेथॉन खेळी केली. या दोघांनी भारतीय आक्रमणाच्या ठिकऱ्या उडवत १० विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून दिला. या लढतीत सहा भारतीय गोलंदाजांनी प्रयत्नांची शर्थ केली पण बटलर-हेल्स जोडीने त्यांना निष्प्रभ ठरवलं. १२ वर्षांपूर्वी याच दोन संघांमध्ये कोलंबोच्या आर.प्रेमदासा स्टेडियमवर लढत झाली होती. भारतीय संघाने इंग्लंडवर ९० धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना १७० धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर खेळलेल्या रोहित शर्माने ३३ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५५ धावांची खेळी केली. गौतम गंभीरने ४५ तर विराट कोहलीने ४० धावा केल्या. इंग्लंडतर्फे स्टीव्हन फिनने २ विकेट्स घेतल्या. इंग्लंडला हे लक्ष्य मानवलं नाही आणि त्यांचा डाव ८० धावांतच गडगडला. हरभजन सिंगने १२ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स पटकावल्या. इरफान पठाण, पीयुष चावला यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत हरभजनला चांगली साथ दिली. या लढतीत इंग्लंडच्या डावात जेड डरबान्च रनआऊट झाला. त्याआधी अशोक दिंडाने स्टुअर्ट ब्रॉडला बाद केलं. त्यामुळे अशोक दिंडा हा टी२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या फलंदाजाला बाद करणारा शेवटचा भारतीय गोलंदाज आहे. ४० वर्षीय अशोक दिंडाने १३ वनडे आणि ९ टी२० लढतीत भारताचं प्रतिनिधित्व केलं. दिंडाला भारतासाठी खेळताना मोठ्या प्रमाणावर संधी मिळाल्या नाहीत पण डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अशोक दिंडाचं योगदान प्रचंड आहे. पश्चिम बंगालच्या आक्रमणाचा प्रमुख दिंडाने ११६ सामन्यात ४२० विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल स्पर्धेत दिंडा दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू. पुणे वॉरियर्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघांकडून खेळला आहे.