पीटीआय, अहमदाबाद : ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ‘अव्वल आठ’ फेरीच्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर आता फलंदाज, फलंदाजीचा क्रम आणि डावखुर्या फलंदाजांचे नियोजन अशा सर्वच आघाड्यांवर संघ व्यवस्थापन फेरविचार करत असल्याची चर्चा आहे.
साहाय्यक प्रशिक्षक रायन टेन दोएशहाते आणि फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी तसे संकेतच दिले आहेत. तीन सामन्यांत अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्मा, तिलक वर्मा यांच्यापैकी एकावर गच्छंतीची वेळ येऊ शकते. त्याच बरोबर रिंकू सिंहचेही स्थान धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे समजते.
एका पराभवाने बसलेल्या जोरदार झटक्यानंतर संघात बदल तर अपेक्षित आहेत. मात्र, ते कसे आणि काय करायचे याबाबत संघ व्यवस्थापन विचार करत असल्याचे फलंदाजी प्रशिक्षक कोटक यांनी सांगितले. अर्थात, नियोजन आहे तेच ठेवावे की बदलावे यावर अजून व्यवस्थापनात एकमत नाही. आम्ही विचार करत असल्याचे कोटक यांनी स्पष्ट केले.
साहाय्यक प्रशिक्षक दोएशहाते यांनी मात्र थेट विधान करताना फलंदाजीतील अपयश लक्षात घेता ते भरून काढणारा एकही फलंदाज राखीव खेळाडूंत नाही याची कबुलीच दिली. आघाडीच्या फळीतील डावखुर्या फलंदाजांचे नियोजन देखील सुधारण्याची गरज आहे. यासाठी पुन्हा एकदा संजू सॅमसनचा विचार होऊ शकतो. सलामीला डाव्या-उजव्या हाताने फलंदाजी करणारी जोडी यशस्वी ठरू शकते असे दोएशहाते यांनी थेट सांगितले.
भारताच्या फलंदाजीतील अपयशात सर्वाधिक चर्चा अभिषेक आणि तिलक यांच्याबाबतच होत आहे. विश्वचषक स्पर्धेदरम्यानच अभिषेकला अन्नातून विषबाधा झाल्याने पोटाच्या विकाराचा सामना करावा लागला. यामुळे त्याच्या क्षमतेवर खूप परिणाम झाला. लागोपाठ तीन वेळा शून्यावर बाद झाल्याने त्याच्यावर दडपण आले असावे, असे सांगून दोएशहाते यांनी उपलब्ध परिस्थितीत पर्याय शोधून काम करणे इतकेच आमच्या हाती असल्याचे स्पष्ट केले.
‘‘सातत्यपूर्ण अपयशानंतर संघात दोन दिवसांत बदल होऊ शकत नाहीत. अपयशावर काम करण्यासाठी किमान पंधरा दिवसांचा तरी कालावधी आवश्यक आहे. हा माझा प्रशिक्षण अनुभव आहे. मात्र, सध्या आमच्याकडे इतका कालावधी नाही. मैदानात उतरल्यावर चेंडू पाहणे आणि त्याच्या दर्जानुसार खेळणे हेच नियोजन आवश्यक आहे,’’ असे कोटक म्हणाले.
रिंकू सिंहची पाठराखण
दोएशहाते यांनी रिंकू सिंहची पाठराखण झाली. ‘‘मुळात रिंकू सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर खेळायला येतो. त्याला फारशी संधीच मिळालेली नाही. फलंदाजीच्या सरावात लय कशी आहे यापेक्षा त्याची मैदानावर कामगिरी काय हे महत्त्वाचे आहे. मैदानावर चांगली कामगिरी करण्याची वेळ आली आहे,’’ असेही दोएशहाते यांनी मान्य केले.
फाजील आत्मविश्वासाचा फटका – गावस्कर
- फलंदाजीच्या अपयशावर बोट ठेवताना माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी भारताला फाजील आत्मविश्वास महागात पडत आहे, असे म्हटले आहे.
- भारतीय खेळाडूंनी आमच्यासारखे आम्हीच अशा पद्धतीचा अहंकार सोडून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांकडून धडा घ्यायला हवा होता, अशी खरमरीत टीका गावस्कर यांनी केली.
- ‘‘ब्रेव्हिस आणि मिलर यांनी ज्या पद्धतीने भागीदारी रचली, त्याची नक्कल केली असती, तरी भारतीय फलंदाजांना विजयापर्यंत जाता आले असते. त्यांच्या नियोजनाची दखल भारतीयांनी घ्यायला हवी होती,’’ असे गावस्कर म्हणाले.
- ‘‘मैदानात आल्यावर फक्त चौकार-षटकारांनी धावा होतात असेच भारतीयांच्या फलंदाजीतून वाटत होते. त्यांचे सर्व झेल सीमारेषेवर घेतले गेले हेच यातून दर्शवते. भारताच्या प्रत्येक फलंदाजांमध्ये हुशारी आहे. पण, त्या हुशारीचा वापर करण्यासाठी आवश्यक असलेल्या दृष्टिकोनाचा अभाव त्यांच्यात दिसून आला,’’ असेही गावस्कर म्हणाले.

