ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये, भारत हा एकमेव संघ आहे, ज्याने सलग दोन सामने जिंकले आहेत. सुपर-१२ च्या ग्रुप-२ मध्ये भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड्सचा पराभव करून गुणतालिकेत अव्वल स्थान मजबूत केले आहे. संघाला पुढील सामना रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे. दोन सामन्यांतून एका विजयासह तीन गुणांसह दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना खडतर असू शकतो. अशा परिस्थितीत अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने या सामन्याबाबत टीम इंडियाला आवश्यक सल्ला दिला आहे. स्टेनने अशा गोलंदाजांची नावे सांगितली आहेत, ज्यांच्यापासून भारताला सावध राहण्याची गरज आहे. माजी वेगवान गोलंदाजाने सध्याच्या स्पर्धेत खेळत असलेल्या 5 आवडत्या वेगवान गोलंदाजांची नावेही सांगितली आहेत.

आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत डेल स्टेनला म्हाणाला की, “मला आशा आहे की दक्षिण आफ्रिका पुढे जाऊन हा विश्वचषक जिंकू शकेल. कागिसो रबाडा आणि एनरिक नोर्टजे संघात असल्याने संघाच्या आशा दुप्पट झाल्या आहेत. मला वाटतं दोघांच कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे.”

हेही वाचा – T20 World Cup 2022 : बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांचे विराटबाबत पहिल्यांदाच मोठे वक्तव्य, म्हणाले ‘हे माझ्यासाठी……!’

तो पुढे म्हणाला की, हे दोन्ही गोलंदाज भारताविरुद्धच्या सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. स्टेन म्हणाला, “त्यांच्याकडे वेग आणि कौशल्ये खूप आहेत, विशेषतः ऑस्ट्रेलियामध्ये. रबाडा जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलियाला जातो, तेव्हा त्याची वेगळी पातळी असते. त्यामुळे मला त्याच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. हे दोन्ही वेगवान गोलंदाज यावेळी दक्षिण आफ्रिकेला विश्वचषक जिंकून देऊ शकतात.”

रबाडा आणि नॉर्टजे व्यतिरिक्त, माजी वेगवान गोलंदाजाने या स्पर्धेत आपापल्या संघाचा भाग असलेल्या इतर तीन वेगवान गोलंदाजांच्या नावांचाही उल्लेख केला. त्याने इंग्लंडचा मार्क वुड, ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांचे नाव घेतले आहे. डेल स्टेनने आयसीसी पुरुष T20 विश्वचषक २०२२ मधील पाच आवडत्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत, एकाही भारतीय गोलंदाजाचा समावेश केलेला नाही.