टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान अर्शदीप सिंगविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलला हरभजन सिंगने पुन्हा एकदा सुनावले आहे. पाकिस्तानच्या या माजी खेळाडूने माफी मागूनही हरभजनचा राग काही कमी होताना दिसत नाही. भज्जीने नुकत्याच केलेल्या वक्तव्यातही कामरानला ‘नालायक’ असे म्हटले आहे.

भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान एआरवाय वाहिनीवर बोलताना कामरानने अर्शदीपसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग कामरानच्या वक्तव्याने चांगलाच भडकला. भारत-पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान अकमलने अर्शदीपच्या धर्माबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती. अर्शदीपने भारत-पाक सामन्यातली शेवटचे षटक टाकले, ज्यात त्याने १८ धावांचा बचाव केला. यावर, हरभजन सिंगने रिपोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अकमल म्हणत आहे की, “काहीही होऊ शकते. १२ वाजले आहेत.” असे बोलून तो जोरजोरात हसायला लागतो.

हेही वाचा – T20 WC 2024: दुबळ्या स्कॉटलंडचा बलाढ्य इंग्लंडला दणका, वर्ल्डकपमध्ये आणखी एका मोठ्या संघावर नामुष्की

कामरानच्या वक्तव्याचा व्हिडिओ ट्विट करून भज्जीने आपली नाराजी व्यक्त केली. यानंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने सोशल मीडियावर ट्विट करून माफीही मागितली. कामरान अकमलने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत त्याने माफी मागितली आणि लिहिले, “माझ्या अलीकडील टिप्पणीबद्दल मी मनापासून खेद व्यक्त करतो आणि हरभजन सिंग आणि शीख समुदायाची मनापासून माफी मागतो. माझे शब्द अयोग्य आणि अपमानास्पद होते. मला जगभरातील शीख लोकांबद्दल खूप आदर आहे आणि माझा कधीही कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मला खरच माफ करा.”

हेही वाचा – IND vs PAK: “३० मिनिटांत भेटू, डिनरमध्ये…”, विजयानंतर पत्नीनेच घेतली बुमराहची मुलाखत; संजना गणेशन-जसप्रीतचा VIDEO व्हारल

मात्र एएनआयला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हरभजन सिंगने पुन्हा एकदा अकमलवर ताशेरे ओढले आणि खूप स्प्षट शब्दात त्याला समजावत शीखांनी त्याच्या समुदायासाठी काय योगदान दिले याच्याबद्दल सांगितले.

एएनआयशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, “अतिशय मूर्खपणाचे विधान आणि बालिश कृत्य आहे, जे एखादा नालायक माणूसच करू शकतो. कामरान अकमलला हे कळलं पाहिजे की, कोणाच्याही धर्माबद्दल काहीही बोलण्याची आणि त्याची खिल्ली उडवण्याची गरज नाही. मी कामरान अकमलला विचारू इच्छितो की तुला शिखांचा इतिहास माहित आहे का? हे शीख कोण होते आणि यांनी काय कार्य केलं आहे. याच शिखांनी तुमचा समुदाय, तुमच्या माता, भागिनींना वाचवण्यासाठी दिलेलं योगदान माहित आहे का? हे तुमच्या पूर्वजांना विचारा, रात्री १२ वाजता शीख मुघलांवर हल्ला करायचे आणि तुमच्या माता-भगिनींना वाचवायचे, त्यामुळे फालतू बोलणं बंद करा. त्याला इतक्या लवकर समजलं आणि माफी मागितली हे चांगलं आहे. पण त्याने पुन्हा कधीही शीख किंवा कोणत्याही धर्माला दुखावण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो, मग तो हिंदू, इस्लाम, शीख किंवा ख्रिश्चन धर्म असो.”

हरभजन सिंगचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हरभजनच्या वक्तव्यावर चाहत्यांनीही अकमलला चांगलंच सुनावलं आहे.