Azam Khan Trolls On Social Media : टी-२० विश्वचषक २०२२ च्या हंगामातील उपविजेता संघ पाकिस्तानला अमेरिकेसारख्या कमकुवत संघाविरुद्ध पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विश्वचषक २०२४ चा दुसरा सुपर ओव्हर सामना पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात खेळला. या सामन्यात अमेरिकेने पाकिस्तानचा चांगला बँड वाजवला. या पराभवानंतर पाकिस्तान संघाची आणि खेळाडूंची सोशल मीडियावर खूप खूप खिल्ली उडवली जात आहे. यामध्ये आझम खान सर्वात जास्त ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.

या विश्वचषकात पाकिस्तान संघात आझम खानचा समावेश करण्यात आला आहे, ज्यावर सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित केले जात होते. आता पहिल्याच सामन्यात या खेळाडूने आपल्या खराब कामगिरीने चाहत्यांची आणि संघाची निराशा केली. यानंतर चाहते सोशल मीडियावर या खेळाडूची खिल्ली उडवत आहेत. त्याचबरोबर मजेशीर मीम्सही शेअर करत आहेत.

आझम खान सोशल मीडियावर ट्रोल –

अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आझम खानचाही समावेश होता. यापूर्वी आझम खानच्या संघात समावेश करण्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अमेरिकेविरुद्ध आझम खाते न उघडताच बाद झाला. यानंतर आझम खानची सोशल मीडियावर खिल्ली उडवायला सुरुवात झाली आहे. पोस्ट शेअर करताना एका यूजरने लिहिले की, त्याला भूक लागली म्हणून त्याने अंडी बनवली. या पोस्टमध्ये यूजरने आझम खानचा फोटोही शेअर केला आहे.

हेही वाचा – Pak vs USA: पाकिस्तानचं पानिपत; सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेकडून पराभवाची नामुष्की

आणखी एका यूजरने या पोस्टवर कमेंट करताना लिहिले की, ‘भूक लागते, त्यामुळे एक दिवस आपले करिअर खाईन.’ आणखी एका युजरने लिहिले, ‘आता रिकाम्या पोटी कोणी काय करु शकतो?’

पाकिस्तानसाठी मोहम्मद आमिर ठरला खलनायक –

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने अमेरिकेला १६० धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात अमेरिकेचा संघ १५९ धावाच करु शकला. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला अर्थात टाय झाला. त्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये १९ धावांचे लक्ष्य दिले. ज्यानंतर पाकिस्तानला १३ धावाच करता आल्या. सौरभ नेत्रावळकरने सुपर ओव्हरमध्ये विकेट काढल्याने अमेरिकेचा विजय सोपा झाला. या सगळ्यानंतर पाकिस्तान संघाचे चाहते पराभवाचे खापर सुपर ओव्हर टाकणाऱ्या मोहम्मद आमिरवर फोडत आहेत. कारण त्याने या सुपर ओव्हरमध्ये ३ वाइडसह १८ धावा खर्च केल्या.

हेही वाचा – मिचेल स्टार्कच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाची वाढली डोकेदुखी, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? जाणून घ्या

विजयासह अमेरिका संघाला झाला फायदा –

टी-२० विश्वचषकात अमेरिकेचा हा सलग दुसरा विजय आहे. या विजयासह यूएसएने टीम इंडियाला मागे टाकत आपल्या गटात पहिले स्थान मिळवले आहे. दोन सामने जिंकल्यानंतर यूएसए संघाचे ४ गुण झाले आहेत. आता भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.