Virat Kohli Batting Position in T20 WC 2024: भारतीय संघ आज म्हणजेच २२ जूनला बांगलादेश संघाविरुद्ध सुपर ८ फेरीतील दुसरा सामना खेळणार आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला सामना एकतर्फी जिंकला होता. मात्र, असे असतानाही विराट कोहलीचा फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. कोहली गट सामन्यांमध्ये तीन डावांमध्ये एकेरी धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता, तर अफगाणिस्तानविरुद्ध त्याला २४ चेंडूत फक्त २४ धावा करता आल्या.

यंदाच्या विश्वचषकात कोहलीला सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळाली आहे, ज्यामध्ये तो आतापर्यंत मोठी कामगिरी करू शकलेला नाही. अशा स्थितीत त्याला पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरवण्यात यावे अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला, यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांची बोलती बंद केली आहे.

हेही वाचा – VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांना पत्रकार परिषदेत विराट कोहलीच्या फलंदाजी क्रमांकाबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी आपल्या उत्तराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. विक्रम राठोड म्हणाले की, “कोहली सलामीसाठी उतरतो हे पाहून तुम्ही खूश नाही आहात का? मला वाटलं कोहलीने डावाची सुरुवात करावी अशी प्रत्येकाची इच्छा होती. राठोड यांनी प्रश्न विचारत असलेल्या पत्रकाराला मध्येच रोखलं आणि म्हणाले; आम्ही याबाबत (विराटचा फलंदाजी क्रम बदलण्याबाबत) अजिबात विचार करत नाहीय. आम्ही संघाच्या फलंदाजी क्रमावर खूप समाधानी आहोत आणि जर फलंदाजी क्रमात बदल केलाच तर प्रतिस्पर्धी संघ आणि परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल.”

हेही वाचा – T20 WC 2024: आतापर्यंत सगळे सामने जिंकलेल्या दक्षिण आफ्रिकेला गाशा गुंडाळावा लागू शकतो, असं आहे समीकरण

आत्तापर्यंत कोहलीने या टी-२० विश्वचषकात चार डाव खेळले असून यादरम्यान त्याने १, ४, ० आणि २४ धावा करण्यात यशस्वी झाला आहे. त्यामुळे कोहलीकडून सर्वांनाच विश्वचषकात एका विराट खेळीची अपेक्षा आहे. बांगलादेशविरूद्ध विराटचा रेकॉर्ड खूपच चांगला आहे. विराटने त्याच्या वर्ल्डकप कारकिर्दीतील पहिलं शतक बांगलादेशविरूद्ध झळकावलं होतं. तर २०२२ च्या वर्ल्डकपमध्ये आपल्या शतकांचा दुष्काळही त्याने बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात शतक झळकावत संपवला होता.