IND vs ENG, T20 World Cup 2024 Match Weather and Pitch Report : आज उपांत्य फेरीतील दुसरा सामना भारत आणि इंग्लंड संघांत होणार आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आतापर्यंत अपराजित आहे. त्याचबरोबर इंग्लंडला ग्रुप स्टेज आणि सुपर-८ मध्ये प्रत्येकी एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सुपर-८ फेरीत ऑस्ट्रेलियाचा २४ धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली, तर इंग्लंडने अमेरिकेचा १० गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता या दोन्ही संघांतील सामन्यादरम्यान हवामान कसे असणार आहे, ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत मागील पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज –

उपांत्य फेरीचा दुसरा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात भारताची नजर इंग्लंडविरुद्धच्या मागील पराभवाचा बदला घेण्याकडे असेल. खरं तर, टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये, इंग्लिश संघाने उपांत्य फेरीत भारताचा १० गडी राखून पराभव करून अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकले होते. आता रोहित शर्मा आणि कंपनीला त्यांच्या भूतकाळातील चुकांमधून शिकून इंग्लंडला हरवायचे आहे.

हवामान कसे असेल?

तमाम क्रिकेट चाहते उपांत्य फेरीच्या सामन्याची वाट पाहत आहेत, पण गयानामधील हवामानामुळे हृदयाचे ठोके वाढले आहेत. सामन्यादरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. Weather.com च्या मते, गयानामध्ये सामन्याच्या दिवशी पावसाची ६० % शक्यता आहे, ज्यामुळे संपूर्ण सामना होण्याची शक्यता कमी होते. स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता खेळ सुरू झाल्यावर पावसाचा अंदाज ३३% ने सुरू होतो आणि स्थानिक वेळेनुसार दुपारी एकच्या सुमारास ५९% पर्यंत पोहोचतो. त्यामुळे, हा सामना थांबवून -थांबवून खेळला जाण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे खेळाडू आणि चाहते दोघांचीही निराशा होऊ शकते.

हेही वाचा – टी२० तडका: डोकं चालवा आणि क्विझ सोडवा!

पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणत्या संघाला फायदा होईल?

टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाला, तर त्याचा फायदा भारतीय संघाला होईल. वास्तविक, भारताने ग्रुप स्टेज आणि सुपर-८ मधील सर्व सामने जिंकले आहेत. सुपर-८ मध्ये भारताने तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यांच्या खात्यात सहा गुण आहेत तर इंग्लंडच्या खात्यात चार गुण आहेत. या आधारावर भारत अंतिम फेरीसाठी सहज पात्र ठरेल.

खेळपट्टी कशी असेल?

कमी स्कोअरिंग आणि फिरकीसाठी अनुकूल मैदान मानल्या जाणाऱ्या गयाना येथील प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. त्यामुळे वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकीपटूंना जास्त मदत झाली आणि अधिक धावा करण्यासाठी फलंदाजांना खूप संघर्ष करावा लागला.

हेही वाचा – Ind vs Eng: १२ वर्ष झाली, टीम इंडियाला इंग्लंडची विकेट काढता येईना, कोण आहे तो बॉलर ज्याने मिळवून दिली होती शेवटची विकेट?

टी-२० विश्वचषकात भारत-इंग्लंड चार वेळा आमनेसामने –

बाद फेरीत भारतीय संघ पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जोस बटलरच्या सेनेचा सामना करताना दिसणार आहे. टी-२० क्रिकेटमध्ये दोन्ही संघ २३ वेळा भिडले आहेत, ज्यात भारताचा वरचष्मा राहिला आहे. टीम इंडियाने १२ सामने जिंकले आहेत तर इंग्लंडने ११ सामन्यात विजयाची चव चाखली आहे. त्याचवेळी, टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात इंग्लंडचा भारताशी चार वेळा सामना झाला आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng guyana weather forecast skies sending mixed signals ahead of t20 world cup semi final 2024 vbm
Show comments