टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज होण्याचा विक्रम विराटने स्वत:च्या नावावर केला आहे. विराटने सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेला मागे टाकलं आहे. विराटने जयवर्धनेचा टी-२० विश्वचषक स्पर्धेमधील एक हजार १६ धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. २०१४ साली जयवर्धनेनं केलेला हा विक्रम मोडीत काढला आहे.

नक्की वाचा >> IND vs BAN T20 World Cup: …तर भारताचा उपांत्यफेरीतील प्रवेश कठीण; पाकिस्तानला लागणार पात्रतेची लॉटरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोहलीने टी-२० विश्वचषक स्पर्धेमधील भारताच्या चौथ्या सामन्यामध्ये बांगलादेशविरुद्ध खेळताना हा विक्रम नोंदवला. ८० च्या सरासरीने १३० हून अधिकच्या धावगतीने कोहलीने हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. सामन्यातील सातव्या षटकामध्ये कोहलीने वैयक्तिक स्तरावर १३ व्या चेंडूंवर एक हजार १६ धावांचा हा टप्पा ओलांडला. टस्कीन अहमदच्या गोलंदाजीवर मिडविकेटला एक धाव काढत हा विक्रम कोहलीने आपल्या नावावर नोंदवला.

पाचवी टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळणाऱ्या कोहलीने २३ डावांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. यामध्ये १२ अर्धशतकांचा समावेश आहे. यापूर्वी ३१ डावांमध्ये महिला जयवर्धनेनं हा विक्रम नोंदवला होता. मात्र जयवर्धनेनं कोहलीपेक्षा कमी चेंडू खेळून हा विक्रम आपल्या नावे नोंदवला होता. जयवर्धनेनं ७५४ चेंडूंमध्ये तर कोहलीने ७७३ चेंडूंमध्ये हा विक्रम आपल्या नावावर केला.

नक्की वाचा >> World Cup: पुन्हा गंभीर v/s आफ्रिदी… यंदा कारण ठरला बाबर आझम; गंभीरच्या ‘स्वार्थी’ टीकेवर आफ्रिदी म्हणाला, “या स्पर्धेनंतर…”

२०१२ मध्ये आपल्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये कोहलीने १८५ धावा केल्या होत्या. तर २०१४ च्या पर्वात तो सर्वाधिक धावा करणारा तर २०१६ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावरील खेळाडू होता. २०१४ आणि २०१६ साली कोहलीला मालिकावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. सलग दोन पर्वांमध्ये हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला होता. विराटला टी-२० विश्वचषकाच्या सहा सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार मिळाला आहे.

२०२२ च्या विश्वचषक स्पर्धेआधी कोहलीच्या नावावर ८४५ धावा होत्या. पहिल्या दोन सामन्यांमध्ये विराटने पाकिस्तान आणि नेदरलॅण्ड्सविरोधातील सामन्यांमध्ये सलग दोन नाबाद अर्धशतकं केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कोहलीला नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. कोहली १२ धावांवर बाद झाला. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये तिलकरत्ने दिलशान (८९७), रोहित शर्मा (९०४) आणि ख्रिस गेल (९६५) या खेळाडूंचा समावेश आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs bangladesh t20 world cup 2022 virat kohli becomes the highest run scorer in mens t20wc scsg
First published on: 02-11-2022 at 15:01 IST