IND vs ENG Highlights, T20 World Cup 2024: पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत गतविजेत्या इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अशा प्रकारे भारतीय संघाने १० वर्षानंतर अंतिम फेरीत धडक मारली. कर्णधार रोहित शर्माच्या ३९ चेंडूत ५७ धावा आणि सूर्यकुमार यादवच्या ४७ धावांच्या जोरावर भारताने २० षटकात ७ गडी गमावून १७१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १६.४ षटकांत १०३ धावांत गडगडला. भारताकडून मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने १९ धावांत तीन बळी घेतले, तर अक्षर पटेलने २३ धावांत तीन बळी घेतले. या कामगिरीसाठी अक्षरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. आता शनिवारी संघाचा सामना जेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. २००७ मध्ये भारताने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते आणि आता विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी असेल.