Deepal Trivedi Reveals About Jasprit Bumrah's Childhood : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी मात करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. भारतीय संघाला ही विश्वचषक जिंकून देण्यात स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा मोठा वाटा राहिला. जसप्रीत बुमराहने टी-२० विश्वचषक २०२४ च्या ८ सामन्यात ८.२७ च्या सरासरीने गोलंदाजी करताना १५ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहला टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' पुरस्कार मिळाला आहे. भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद पटकावल्यानंतर जसप्रीत बुमराहची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. या जसप्रीत बुमराहच्या आयुष्याशी संबंधित एक न ऐकलेली आणि भावनिक गोष्ट समोर आली आहे. सोशल मीडियावर, ज्येष्ठ पत्रकार दीपल त्रिवेदी यांनी जसप्रीत बुमराहच्या आयुष्याशी संबंधित एक भावनिक प्रसंग पोस्टद्वारे चाहत्यांशी शेअर केला आहे. दीपल त्रिवेदी जसप्रीत बुमराहचा जन्म झाला तेव्हा अहमदाबादमध्ये त्याच्या शेजारी राहत होत्या. तसेच त्रिवेदी जसप्रीत बुमराहच्या कुटुंबाला खूप जवळून ओळखतात. दीपल त्रिवेदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर आपल्या दीर्घ पोस्टमध्ये लिहिले की, 'माझे क्रिकेटचे ज्ञान शून्य आहे. मी विराट कोहलीला अनुष्का शर्माचा नवरा म्हणूनही ओळखते. तो नृत्य करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला ते आवडते. पण ही (दीर्घ) पोस्ट माझ्या हिरोबद्दल आहे.' जसप्रीत बुमराहच्या बालपणीचा भावनिक गोष्ट- जसप्रीत बुमराहच्या जन्माची भावनिक गोष्ट सांगताना दीपल त्रिवेदी यांनी लिहिले की, 'डिसेंबर १९९३ मध्ये एक दिवस, जेव्हा माझा पगार ८०० रुपयांपेक्षा कमी होता, तेव्हा माझ्या जवळच्या मित्राने (बुमराहची आई) मला सुट्टी घेण्यास भाग पाडले. ती गरोदर होती. मी २२-२३ वर्षांची असावी आणि त्या डिसेंबरचा बहुतेक काळ मी अहमदाबादच्या पालडी भागातील हॉस्पिटलमध्ये घालवला. माझी मैत्रीण दलजीत बुमराहचा नवरा जसबीर सिंग बुमराह काही मिनिटांपूर्वी बाहेर आला होता. यानंतर जेव्हा नर्सने हाक मारली आणि माझ्या थरथरत्या हातात बाळ दिलं. इतक्या लहान बाळाला हातात घेण्याची माझी पहिलीच वेळ होती.' हेही वाचा - ICC ने T20 WC नंतर जाहीर केली ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’, भारताचे तब्बल ६ खेळाडू, मात्र या दिग्गजाचं नाव नाही जसप्रीतने कधीही अभ्यासात रस दाखवला नाही - जसप्रीत बुमराहचा लहानपणीच्या शेजारी दीपल त्रिवेदी यांनी पुढे लिहिले, 'मला आठवतं की बाळाचं वजन खूपच कमी होतं. ते हसण्याचा प्रयत्न करत होतं, पण ते खरच हसत नव्हतं. नर्स म्हणाली हा मुलगा आहे. बाळाचं वजन खूपच कमी असल्याने ते अशक्त होतं. मात्र, माझ्या मैत्रिणीला मुलगा झाल्याने खूप आनंद झाला होता. मी आधीच त्यांची मुलगी जुहिका हिची गॉडमदर होते. शेजारी असल्याने आम्ही सर्व काही शेअर करायचो. माझ्याकडे फोन, फ्रीज किंवा बेडही नव्हता! त्यामुळे त्यांचे घर माझे आश्रयस्थान होते. दुर्दैवाने, माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याचे (जसप्रीत बुमराहचे वडील) लवकरच निधन झाले. यानंतर सगळं आयुष्य बदललं. त्यावेळी महिनाभर मी मुलांची काळजी घेतली. त्यांना शिकवले. मुलाने (जसप्रीत बुमराह) कधीही अभ्यासात रस दाखवला नाही. त्यावेळी त्याने प्लास्टिक बॉलने खेळायला सुरुवात केली.' हेही वाचा - World Cup Trophy : विजेत्या संघाला दिलेली विश्वचषक ट्रॉफी खरी असते का? ती कोणाकडे ठेवली जाते? जाणून घ्या सर्व काही बुमराहची आई १६-१८ तास काम करायची - जसप्रीत बुमराहच्या बालपणाबद्दल त्यांनी पुढे लिहिले की, 'कधीकधी मी त्यांची बिस्किटेही खायचे. कारण मुलांची काळजी घेताना मला पण भूक लागायची. आम्ही उपाशी राहिलो, आम्ही रडलो, आम्ही संघर्ष केला. जुहिका, ज्या मुलीची मी गॉडमदर होते, ती मी पाहिलेली सर्वात सुंदर मुलगी आहे आणि तिने मला एक नवी आशा दिली. पण मुलाच्या अडचणी खूप होत्या. आम्ही त्याला अमूल डेअरीचे पॅकेट किंवा दुधाचे पॅकेट देऊ शकलो नाही. तो मोठा झाला तसं आम्ही आपापल्या कामात व्यग्र झालो होतो. त्याची आई रोज किमान १६-१८ तास काम करायची. त्याची बहीण एकदम उत्साही पण तो मात्र एकदम शांत, लाजाळू असा होता. काल रात्री त्याने भारतासाठी क्रिकेट विश्वचषक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे आणि त्याच्याकडून शिकले पाहिजे. तो पूर्वी जसा थोरामोठ्यांचा आदर करायचा तसाच आजही करतो.'