टी२० वर्ल्डकपच्या निमित्ताने अनेक माजी खेळाडू प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत. दक्षिण आफ्रिकेचे दोन बंधू आणि माजी खेळाडू एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. कोणत्या मुलाला पाठिंबा द्यायचा असा प्रश्न आईसमोर आहे असं यांच्यापैकी एकाने सांगितलं. ही जोडगोळी आहे अ‍ॅल्बी आणि मॉर्ने मॉर्केल.

खेळताना प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या मनात धडकी भरवणारा उंचपुरा मॉर्ने मॉर्केल भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. दुसरीकडे अष्टपैलू खेळाडू म्हणून नाव कमावलेला अ‍ॅल्बी मॉर्केल दक्षिण आफ्रिकेच्या सपोर्ट स्टाफमध्ये आहे. भावाशी बोलतोस का? यासंदर्भात अ‍ॅल्बीने सुरुवातीला गंभीर चेहरा केला मात्र त्यानंतर हसतहसत उत्तर दिलं. मी मॉर्नेशी बोलत नाही. गंमत करतोय. खरा प्रश्न आईसमोर आहे. एक मुलगा आफ्रिकेच्या संघासमोर आहे, एक भारतीय संघाचा सहाय्यक प्रशिक्षक आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका रविवारी अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ प्राथमिक फेरीत अजिंक्य असून या दोन संघांमधला मुकाबला चाहत्यांसाठी दर्जेदार खेळाची पर्वणी असणार आहे.

मॉर्नेने गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यापासून भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीत निश्चितच सुधारणा झाली आहे. शिवम दुबे एक गोलंदाज म्हणून पुढे येताना दिसत आहे. विकेट्स पटकावणं आणि धावा रोखणं या दोन्ही आघाड्या भारतीय गोलंदाज सातत्याने सांभाळत आहेत.

अ‍ॅल्बी दक्षिण आफ्रिका संघाबरोबर स्पेशालिस्ट कंसल्टंट म्हणून काम करत आहे. अ‍ॅल्बी आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळला आहे. भारतीय खेळपट्ट्यांची त्याला पुरेशी माहिती आहे. टी२० प्रकारात चौकार, षटकार लगावणं महत्त्वाचं असतं. खेळत असताना जोरदार फटकेबाजीसाठी अ‍ॅल्बी ओळखला जात असे. भागीदारी तोडण्यात निपुण अशीही त्याची ओळख होती. कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, अँनरिक नॉर्किया, क्वेना मफाका, मार्को यान्सन, कार्बिन बॉश यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव अतिशय समृद्ध करणारा आहे असं अ‍ॅल्बीने सांगितलं. दक्षिण आफ्रिकेचं वेगवान आक्रमण अव्वल दर्जाचं आहे. टी२० प्रकारात वेगवान गोलंदाजांची भूमिका निर्णायक आहे. मी प्रामुख्याने गोलंदाजांबरोबर काम करत असलो तरी फलंदाजांनाही मार्गदर्शन करतो.

उष्ण आणि दमट वातावरणात, चाहत्यांचा भारताला पाठिंबा असताना सर्वोत्तम कामगिरी करणं आव्हानात्मक असेल असं अ‍ॅल्बीने सांगितलं. यॉर्कर, स्लोअर वन, उसळते चेंडू यापैकी कशाचा वापर करायचा हे खेळपट्टी पाहून वातावरणाचा अंदाज घेऊन ठरवतो.

प्रशिक्षक म्हणून घडण्यात चेन्नई सुपर किंग्सचे माजी प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांची भूमिका मोलाची आहे असं अ‍ॅल्बीने सांगितलं. अ‍ॅल्बी आणि स्टीफन चेन्नई सुपर किंग्ससाठी एकत्र खेळायचे आणि त्यानंतर याच संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग झाले. प्रशिक्षक म्हणून कधी सल्ला द्यावा, कधी देऊ नये, तांत्रिक गोष्टींबाबत कधी बोलावं, काम करवून कसं घ्यावं अशा मुद्यांबाबत मी स्टीफनकडून खूप गोष्टी शिकलो.

४४वर्षीय अ‍ॅल्बीने एकमेव टेस्ट, ५८ वनडे आणि ५० टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं. टी२० प्रकारात जगभरात विविध लीगमध्ये मिळून ३१९ सामने त्याच्या नावावर आहेत. आयपीएल स्पर्धेत तो चेन्नई सुपर किंग्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स संघांकडून खेळला आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर ९१ सामन्यात ८५ विकेट्स आणि ९७४ धावा आहेत.

४१वर्षीय मॉर्नेने ८६ टेस्ट, ११७ वनडे आणि ४४ टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. तिन्ही प्रकारात मिळून त्याच्या नावावर ५४४ विकेट्स आहेत. आयपीएल स्पर्धेत तो कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला. आयपीएल स्पर्धेत ७० सामन्यात ७७ विकेट्स नावावर आहेत.