IND vs PAK Score Updates: भारत आणि पाकिस्तान यांच्यात न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पहिल्याच षटकात दणतक्यात सुरूवात केली. या षटकारासह रोहितने एक मोठा पराक्रम केला आहे. त्याने पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर असा पराक्रम केला आहे जो यापूर्वी कोणताही फलंदाज करू शकला नव्हता.

शाहीन शाह आफ्रिदीने पाकिस्तानसाठी या सामन्यातील पहिले षटक टाकले. या षटकातील पहिल्या १ चेंडूवर २ धावा केल्या तर दुसरा डॉट बॉल होता. त्याचवेळी रोहित शर्माने षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर एक लांबलचक षटकार खेचला. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात पहिल्याच षटकात कोणत्याही फलंदाजाने शाहीन शाह आफ्रिदीला षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. शाहीन आफ्रिदी टी-२० क्रिकेटमध्ये आपला ६८ वा सामना खेळत आहे. यादरम्यान रोहित शर्मा हा एकमेव फलंदाज आहे ज्याने सामन्याच्या पहिल्याच षटकात शाहीनच्या भेदक गोलंदाजीवर षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.

हेही वाचा – IND vs PAK: रोहित शर्मा पुन्हा विसरला, नाणेफेकीच्या वेळेस झाला गोंधळ अन् बाबर आझमने… पाहा VIDEO

भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांच्यात जबरदस्त टक्कर पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती आणि ती पाहायलाही मिळाली. हे दोन खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातव्यांदा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान रोहित शर्माने ६६ चेंडूत ६० धावा केल्या असून शाहीनने त्याला ३ वेळा बाद केले आहे. फक्त टी-२०च नाही तर वनडे क्रिकेटमध्येही शाहीनच्या गोलंदाजीवर पहिल्या षटकात षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला फलंदाज ठरला होता. १० सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या आशिया कपच्या सुपर-४ एकदिवसीय सामन्यात शाहीनच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला होता.

शाहीन शाह आफ्रिदी गोलंदाजीला आला तेव्हा डावाच्या पहिल्याच षटकात रोहितने षटकार लगावला. मात्र, कर्णधाराची बॅट फार काही करू शकली नाही. १२ चेंडूत १३ धावा करून तो बाद झाला. तिसऱ्या षटकात शाहीनला असाच षटकार मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटच्या खालच्या भागाला लागला आणि रोहित हरिस रौफच्या हाती झेलबाद झाला. रोहितच्या आधी विराट कोहली ४ धावा करून बाद झाला होता. त्याची विकेट नसीम शाहच्या खात्यात गेली. विराट कोहली आणि रोहित शर्मा पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात स्वस्तात बाद झाल्याने या दोघांनाही ट्रोल केलं जात आहे.