Rohit Sharma Statement on India win: कर्णधार रोहित शर्माच्या झंझावाती खेळीनंतर भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या सुपरएट मधील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा २४ धावांनी पराभव करत सुपर एट टप्प्यातील तिन्ही सामने भारताने जिंकले. या विजयासह भारताने उपांत्य फेरी गाठली आहे. सुपर एटचे सर्व तीन सामने जिंकून भारताने सहा गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे आणि २७ जून रोजी उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडशी सामना होईल. गट एक मधून ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या संघांना अजूनही अंतिम चारसाठी पात्र ठरण्याची संधी आहे.

हेही वाचा – भारताने विश्वविक्रमासह सेमीफायनलमध्ये ऐटीत मारली धडक, ऑस्ट्रेलियाविरूद्ध रोहित-कुलदीप ठरले मॅचविनर

भारताने दिलेल्या २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सलामीवीर ट्रॅव्हिस हेडचे अर्धशतक (४३ चेंडूत नऊ चौकार, चार षटकारासह ७८ धावा) आणि कर्णधार मिचेल मार्श (३७) आणि ग्लेन मॅक्सवेल (१९) यांच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावा केल्या. तर तिसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी करूनही ते सात विकेट्सवर केवळ १८१ धावा करू शकले.

हेही वाचा – Ind vs Aus T20 World Cup: रोहित शर्माने वादळी खेळी आणि ट्रॅव्हिस हेडचा झेल पकडत केली अहमदाबादची परतफेड

भारताच्या विजयानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

भारताच्या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला, “हा समाधानकारक विजय आहे. आम्हाला ऑस्ट्रेलिया आणि त्यांच्यासह येणारा धोकाही माहित आहे. एक संघ म्हणून आम्ही चांगली कामगिरी केली, आम्हाला जे साध्य करायचे होते ते करता आले. एक संघ म्हणून आम्हाला चांगला आत्मविश्वास मिळाला आहे. २०० ही चांगली धावसंख्या आहे परंतु जेव्हा तुम्ही येथे खेळत असता तेव्हा वाहणारा वारा हा एक मोठा घटक असतो त्यामुळे काहीही होऊ शकतं, परंतु मला वाटते की आम्ही परिस्थितीचा चांगला सामना केला आणि प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख बजावली ही गोष्टसुद्धा तितकीच खरी आहे. योग्य वेळी विकेट्सही मिळवल्या.”

हेही वाचा – ऋषभ पंतने सोपा झेल सोडल्याचे पाहता रोहितने भर मैदानात घातली शिवी, रागाने लालबुंद झालेल्या कॅप्टनचा VIDEO व्हायरल

कुलदीपच्या गोलंदाजीवर रोहित म्हणाला, “त्याची ताकद आपल्याला माहित आहे, पण सामन्यात गरज असताना योग्यवेळी त्याचा वापर करणं महत्त्वाचं आहे. न्यूयॉर्कमध्ये वेगवान गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टी होत्या. त्यामुळे त्याला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर पडावे लागले, पण आम्हाला माहित आहे की त्याची इथे मोठी भूमिका आहे.”

हेही वाचा – IND v AUS: कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला

सेमीफायनलबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “आम्हाला काहीही वेगळे करायचं नाही, त्याच पद्धतीने खेळायचे आहे आणि प्रत्येकाने आपली जबाबदारी काय आहे समजून घ्यायचे आहे. मुक्तपणे खेळायचंय आणि पुढे काय होणार आहे याचा जास्त विचार करायचा नाही. प्रतिस्पर्धी संघाचा फारसा विचार करत नाही. आम्ही ज्याप्रकारे खेळत आलोय तेच पुढेही करायचं आहे.” उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध खेळण्याबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “हा एक चांगला सामना असेल, एक संघ म्हणून आमच्यात काहीही बदल होणार नाही.”