Rohit Sharma injured in practice session : टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील भारतीय संघ आपला दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माची दुखापत भारतीय संघाला सतावू लागली आहे. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहितला दुखापत झाली होती. जोशुआ लिटलचा वेगवान चेंडू रोहितच्या उजव्या हाताला लागला होता. यानंतर वेदनांनी त्रस्त झालेल्या रोहितने काही वेळानंतर ‘रिटायर्ड हर्ट’ होण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा एकदा रोहित शर्मा दुखापत झाली आहे. ज्यामुळे भारतीय चाहत्यांची पुन्हा धाकधूक वाढली आहे. रोहित पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळणार की नाही? जाणून घेऊया.

बीसीसीआयने कोणतीही अपडेट दिली नाही –

रोहित शर्माच्या दुखापतीबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अपडेट दिलेली नाही. रोहितची दुखापत फारशी गंभीर नाही, अशी आशा भारतीय चाहत्यांना असेल. भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना खूप महत्त्वाचा आहे. हा सामना न्यूयॉर्क विरुद्ध नासाऊ काउंटी स्टेडियमवर होणार आहे. खेळपट्टी पूर्णपणे गोलंदाजांना अनुकूल होणार आहे. अशा परिस्थितीत संघाला रोहित शर्मासारख्या अनुभवी फलंदाजाची गरज आहे, जो अशी परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकेल.

सराव सत्रात रोहितच्या अंगठ्याला दुखापत –

रोहित शर्माच्या अंगठ्याला आता दुखापत झाली आहे. भारतीय कर्णधाराला नेटमध्ये ही दुखापत झाली. तो नेटमध्ये श्रीलंकेच्या थ्रोडाउन स्पेशालिस्ट नुवानविरुद्ध सराव करत असताना चेंडू विचित्रपणे उसळला आणि त्याच्या हाताला लागला. रोहित वेदनेने ओरडताना दिसला. यानंतर फिजिओने लगेच येऊन तपासणी केली. यानंतर रोहितने काही काळ दुसऱ्या टोकाकडून फलंदाजी केली आणि नंतर नेटच्या बाहेर गेला. त्यानंतर कर्णधार पूर्णपणे बरा झाला आणि त्याने पुन्हा सराव सुरू केला. त्यामुळे तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा – AFG vs NZ T20 WC 2024 : अफगाणिस्तानचा न्यूझीलंडला दणका; ८४ धावांनी ऐतिहासिक विजय

न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने आयर्लंडचा ८ गडी राखून पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने ३७ चेंडूत ५२ धावा केल्या होत्या, मात्र वेगवान चेंडूचा लागल्याने त्याला १०व्या षटकानंतर मैदान सोडावे लागले होते. यानंतर या खेळपट्टीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे आयसीसीने गुरुवारी एक निवेदन जारी केले. निवेदनात म्हटले की, “नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आतापर्यंत वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्या अपेक्षेप्रमाणे नाहीत.”

हेही वाचा – AFG vs NZ : अफगाणिस्तानच्या सलामी फलंदाजांनी १० वर्ष जुन्या विक्रमाची केली पुनरावृत्ती, विराट-रोहितशी साधली बरोबरी

आयसीसीने पुढे असेही म्हटले आहे की, ” खेळपट्टीची देखरेख करणारे जागतिक दर्जाचे पथक कालच्या सामन्यापासून खेळपट्टीच्या दुरुस्तीमध्ये व्यस्त आहे, जेणेकरून उर्वरित सामन्यांसाठी चांगली खेळपट्टी तयार करता येईल.” आता या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ९ जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळला जाणार आहे. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्याआधी पाकिस्तानने आयर्लंडविरुद्धची मालिका जिंकली पण एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पाकिस्तान संघाला पहिल्या विजयाची आशा आहे, परंतु भारताविरुद्ध विजय मिळवणे त्यांच्यासाठी सोपे असणार आहे.