Shubman Gill Photo with Rohit Sharma ends all rift rumors: रोहित शर्मा आणि शुबमन गिलमध्ये बिनसलं असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. सोशल मीडियावर तर शुबमन गिलने रोहित शर्माला इन्स्टाग्रामला अनफॉलो केल्या असल्याचे स्क्रिनशॉट व्हायरल झाले होते. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंमध्ये नेमकं काय चाललंय यावर चर्चा सुरू होत्या. पण आता शुबमन गिलने इन्स्टाग्रामवर रोहित शर्मा आणि त्याच्या लेकीसोबत फोटो शेअर केला आहे. या फोटोवरील कॅप्शनने त्याने सर्व चर्चांना योग्य उत्तर देत बोलती बंद केली आहे.

भारताचे गट टप्प्यातील सामने संपले असून भारतीय संघ पुढील फेरी खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला रवाना होणार आहे. भारताने गट टप्प्यातील सुरूवातीचे तिन्ही सामने खेळून सुपर८ फेरीत धडक मारली. वर्ल्डकपसाठी जेव्हा भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा ५ सदस्यीय संघासोबत ४ राखीव खेळाडूंचाही समावेश होता. ज्यामध्ये शुबमन गिल, आवेश खान, रिंकू सिंग आणि खलील अहमद यांचा समावेश होता. आता भारताचे गट टप्प्यातील सामने संपल्याने ४ पैकी २ राखीव खेळाडू हे मायदेशी परतणार असल्याचे वृत्त समोर आले होते. या वृत्तासोबतच शुबमन गिलला शिस्तभंग केल्यामुळे कारवाई म्हणून संघातून रिलीज केले दात असल्याचे म्हटले. तर दुसरीकडे गिलने रोहितला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याची चर्चा सुरू झाली. यावर आता गिलने रोहित शर्मा आणि समायरासोबतचा फोटो शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

हेही वाचा – IND vs CAN सामना रद्द झाल्याने सुनील गावसकर ICC वर भडकले, म्हणाले; “मॅच खेळवूच नका…”

गिलने या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये दोन फोटो शेअर केले आहेत. एक रोहितसोबतचा आणि खाली त्याची लेक समायारासोबतचा फोटो आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले की मी आणि सॅमी रोहितकडून शिस्तीचे धडे घेत आहोत आणि पुढे रोहितला टॅग केलं आहे. या पोस्टसह गिल आणि रोहितमध्ये सगळं अलबेल असल्याचं समोर आलं आहे. तर गिलने या सुरू असलेल्या चर्चांवर आणि अफवा पसरवणाऱ्यांना चांगलाच टोमणाही मारला आहे.

हेही वाचा – ‘क्रिकेटमध्ये सेक्स ही अत्यंत सामान्य गोष्ट…’, अभिषेक नायरचे मुलाखतीत मोठे वक्तव्य, म्हणाला; “एवढं दडपण असतं की…”

सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेवरून शुबमन गिलला रिलीज करण्याचे कारण हे शिस्तभंगाचे आहे, अशी चर्चा सुरू होती. कारण गिल इतर भारतीय संघाला स्टेडियममध्ये सपोर्ट करताना एकदाही दिसला नाही. रिंकू सिंग, आवेश खान आणि खलील अहमद हे इतर राखीव खेळाडू न्यूयॉर्कमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान संघाला चिअर करताना दिसले. खरं तर, बातमी अशी आहे की तो संघापासून दूर वेळ घालवताना दिसला आणि आपल्या इतर कामांमध्ये तो व्यग्र होता. त्याच दरम्यान रोहितला गिलने इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याची चर्चाही सुरू होती. पण गिलच्या एका फोटोने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.