Hardik Pandya’s reaction to a tough situation : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या खूप चर्चेत आहे, एकीकडे त्याची आयपीएलमधील कामगिरी खराब होती, तर दुसरीकडे त्याची पत्नी नताशासोबतच्या घटस्फोटाच्या बातमीने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मात्र, हार्दिक आणि नताशा यांनी या बातम्यांवर उघडपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचवेळी हार्दिकने बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. यानंतर हार्दिकने त्याच्या कठीण काळाबद्दल सांगितले आहे.

हार्दिक पंड्या काय म्हणाला?

बांगलादेशविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात हार्दिक पंड्याने टीम इंडियासाठी अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला १८२ धावांचा मोठा डोंगर उभारण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. हार्दिक पंड्याने २३ चेंडूचा सामना करताना दोन चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने नाबाद ४० धावांचे योगदान दिले. यानंतर गोलंदाजी करताना ३ षटकात ३० देत एक विकेटही घेतली. आयपीएलमध्ये हार्दिकची बॅट शांत होती पण सराव सामन्यात हार्दिकने आपल्या फलंदाजीने दाखवून दिले आहे की तो टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे.

“शेवटी तुम्हाला लढत राहावे लागेल” –

तसेच हार्दिक पंड्याने त्याच्या कठीण काळाबद्दल सांगितले आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला, “माझा विश्वास आहे की शेवटी तुम्हाला लढत राहावे लागेल. कधीकधी आयुष्य तुम्हाला अशा परिस्थितीत आणते जिथे गोष्टी कठीण असतात. पण माझा विश्वास आहे की जर तुम्ही खेळ किंवा मैदान म्हणजे लढा देणे सोडले, तर तुमच्या खेळातून तुम्हाला हवे ते मिळणार नाही किंवा तुम्ही जे निकाल शोधत आहात ते मिळणार नाही. हार्दिक पंड्या पुढे म्हणाला, “होय हे माझ्यासाठी कठीण आहे, पण त्याचवेळी, मी या प्रक्रियेने प्रेरित झालो. या काळात मी तीच दिनचर्या पाळण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याचे मी आधीपासूनच पालन करत आलोय. या गोष्टी घडत राहिल्या आहेत आणि वाईट काळ हे येतात आणि जातात. हे ठीक आहे. मी अनेक वेळा यातून गेलो आहे आणि आता यातूनही बाहेर येईन.”

हेही वाचा – IND vs BAN : हार्दिक पंड्याच्या शॉटने बांगलादेशच्या खेळाडूला गंभीर दुखापत, हाताला पडले तब्बल टाके

“मी माझ्या यशाला फारसे गांभीर्याने घेत नाही” –

यश डोक्यात जात नाही आणि अपयशाचाही त्याच्यावर फारसा परिणाम होत नाही, असेही हार्दिकने सांगितले. हार्दिक पुढे म्हणाला, “मी माझ्या यशाला फारसे गांभीर्याने घेत नाही. मी जे काही चांगले केले ते मी लगेच विसरतो आणि पुढे जातो. कठीण काळातही असेच असते. म्हणून मी कठीण प्रसंगातून पळ काढत नाही. मी पुढे जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा सामना करतो. ते म्हणतात त्याप्रमाणे ही वेळ देखील निघून जाईल. त्यामुळे मी पुढे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा सामना करतो. म्हणून अशा परिस्थितीतून बाहेर पडणे सोपे आहे. फक्त मान्य करावे लागेल की कठोर परिश्रम कधीही व्यर्थ जात नाहीत आणि हसत रहा..”