यष्टिरक्षक-फलंदाज जोश इंग्लिस जखमी झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाने स्फोटक अष्टपैलू कॅमेरून ग्रीनचा टी२० विश्वचषकाच्या १५ सदस्यीय संघात समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या टी२० विश्वचषक संघात बॅकअप यष्टीरक्षक असलेल्या इंग्लिसला सिडनीमध्ये गोल्फ खेळताना हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुखापत गंभीर असल्याने त्याला शस्त्रक्रियेची गरज आहे. त्यामुळे यापुढे तो विश्वचषक स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही.

इंग्लिसच्या दुखापतीचा अर्थ मॅथ्यू वेड हा ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक संघात एकमेव यष्टिरक्षक असेल. ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांनी यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीकडे दुर्लक्ष करून संघात ग्रीनच्या अष्टपैलू कौशल्याला प्राधान्य दिले आहे. उल्लेखनीय म्हणजे ऑस्ट्रेलियाकडे मिचेल मार्श आणि मार्कस स्टॉइनिस हे दोन वेगवान गोलंदाज अष्टपैलू आहेत. यष्टिरक्षक जोश इंग्लिसच्या जागी कॅमेरून ग्रीनचा समावेश करण्याच्या निर्णयामुळे प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण नियमित यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडला दुखापत झाल्यास त्याच्या जागी कोण येणार?

मात्र, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने यासाठीही एका खेळाडूचे नाव सुचवले आहे. यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील स्पर्धेच्या पहिल्या सुपर १२ सामन्याच्या आधी, फिंचने सामनापूर्व पत्रकार परिषदेत सांगितले की, स्पर्धेदरम्यान वेडला दुखापत झाल्यास सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची यष्टिरक्षक म्हणून निवड केली जाईल.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : युझवेंद्र चहलला सपोर्ट करण्यासाठी धनश्री वर्मा पोहोचली ऑस्ट्रेलियात, म्हणाली ‘ये वर्ल्ड कप हमारा है घर लेकर आ…’

फिंच म्हणाला, “कदाचित, डेव्हिड वॉर्नर, मला वाटतं, त्याने काल थोडा सराव केला. मी स्वत:, कदाचित कर्णधारपद आणि कीपिंग, जेव्हा तुम्ही यापूर्वी केले नसेल, ते थोडे कठीण आहे. कदाचित मिचेल स्टार्क आधी गोलंदाजी करेल आणि मध्ये नंतर विकेटकीपिंग करेल. तसेच त्यानंतर शेवटी पुन्हा गोलंदाजी करेल. पण कदाचित डेव्हिड, ही एक जोखीम आहे जी आम्ही या क्षणी घेण्यास तयार आहोत.”

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ग्रीन प्लेइंग इलेव्हनचा भाग नसल्याचा खुलासाही कर्णधाराने केला. फिंचने पुष्टी केली की तो संघासाठी डावाची सुरुवात करेल. तो म्हणाला, “नाही, मला नाही वाटत. तो आज सकाळीच पर्थहून आला आहे. तो कव्हर म्हणून आला आहे. आम्ही अतिरिक्त कीपरसह न जाण्याचा धोका पत्करला, ज्यामध्ये नक्कीच काही प्रमाणात धोका आहे. पण आम्हाला वाटते की कॅम संघाला थोडे चांगले संतुलन देतो.”