Pakistan May be Out of T20 World Cup 2024 If India Defeats Them: टी-२० विश्वचषक २०२४ मधील गट सामन्यात भारत आणि पाकिस्तानचा संघ एकमेकांशी भिडणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघांमधील भिडंत पाहण्यासाठी चाहत्यांपासून क्रिकेट दिग्गजांपर्यंत सर्वच जण उत्सुक आहेत. भारत-पाकिस्तान लढतीत टीम इंडिया कायमचं वरचढ राहिली आहे. त्यामुळे आज म्हणजेच ९ जून रोजी होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघ पाकिस्तानचा पराभव करत सुपर८ च्या दिशेने अजून एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न असेल. तर पाकिस्तानने हा सामना गमावल्यास त्यांना यंदाच्या वर्ल्डकपमधून गाशा गुंडाळून मायदेशी परतावे लागू शकते.

भारत आणि पाकिस्तानचा संघ टी-२० विश्वचषकामध्ये आतापर्यंत सात वेळा आमनेसामने आला आहे. ज्यात तब्बल ६ वेळा भारताने विजय मिळवला आहे तर फक्त एकदाच पाकिस्तानला विजय मिळवण्यात यश आले. त्यामुळे पाकिस्तानसाठी ही लढत काही साधारण असणार नाही. वर्ल्डकपपूर्वी झालेली इंग्लंड विरूद्धची टी-२० मालिका आणि अमेरिकेविरूद्धच्या सामन्यातील पाकिस्तानचा फॉर्म पाहता भारताविरूद्ध खेळताना पाकिस्तानला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा – बाबर आझमला इंग्रजीत विचारलेला प्रश्नच कळला नाही, पाकिस्तानच्या कर्णधाराचं उत्तर ऐकाल तर… VIDEO व्हायरल

ट्वेन्टी२० वर्ल्डकप २०२४च्या संरचनेनुसार प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ सुपर८ साठी पात्र ठरतील. भारत, पाकिस्तानच्या गटात अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंडचा समावेश आहे. भारतीय संघाने आयर्लंडचा धुव्वा उडवत दमदार सलामी दिली. दुसरीकडे पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. अमेरिका आणि भारताविरुद्ध पराभूत झाल्यास पाकिस्तानसाठी पुढची फेरी गाठणं खडतर होईल. भारताविरुद्धच्या लढतीनंतर पाकिस्तानसमोर आयर्लंड आणि कॅनडाचं आव्हान आहे. तुलनेने या लढती सोप्या आहेत.

हेही वाचा – आझम खान: घराणेशाहीचा आरोप होणारा वजनदार खेळाडू का होतो ट्रोल?

अमेरिकेने सलामीच्या लढतीत कॅनडावर विजय मिळवला होता. त्यामुळे सद्यस्थितीत अमेरिका गटात अव्वल स्थानी आहेत. भारताविरुद्ध पराभूत झाल्यास पाकिस्तानसाठी सुपर८चा रस्ता बंद होऊ शकतो. कारण उर्वरित दोन लढती जिंकल्या तरी पाकिस्तानचे चारच गुण होऊ शकतात. अमेरिका आणि भारताला ८ गुण पटकावण्याची संधी आहे. अमेरिकला तूर्तास तरी पाकिस्तानपेक्षा सुपर८ फेरी गाठण्याची संधी जास्त आहे. त्यातही जर अमेरिकेने पुढील लढती गमावल्या तरी अमेरिकेचा नेट रन रेट हा पहिले दोन सामने जिंकल्याने चांगला आहे.

त्यामुळे भारताविरुद्ध जिंकणं पाकिस्तानसाठी करो या मरो अशी आहे. ट्वेन्टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानच्या संघाने नेहमी बाद फेरी गाठली आहे. मात्र यंदा त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. पाकिस्तानने तीन वेळा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे तर एकदा जेतेपदावर नाव कोरलं आहे.