T20 WC 2024 Semi Final Time Table: यंदाचा टी-२० विश्वचषक आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. २० संघांमधून सुपर ८ सामने खेळत आता टॉप-४ संघही निश्चित झाले आहेत, जे वर्ल्डकपवर आपलं नाव कोरण्यासाठी सज्ज आहेत. हे ४ संघ यंदाच्या उपांत्य फेरीत खेळताना दिसणार आहेत. अफगाणिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवल्यानंतर सर्व समीकरणे स्पष्ट झाली. एवढेच नाही तर अफगाणिस्तानने शानदार आणि ऐतिहासिक कामगिरीसह उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यासोबतच आता सर्वांना सेमीफायनलची प्रतीक्षा आहे.

टी-२० विश्वचषकात आता ४ संघ विजेतेपदाचे दावेदार आहेत, यामध्ये पहिल्या गटातील भारत आणि अफगाणिस्तानचा संघ आहे तर दुसऱ्या गटातील इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकाचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडने आधीच त्यांची जागा बुक केली होती. यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यावर टीम इंडियाचे स्थानही निश्चित झाले. यानंतर आज जेव्हा अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील रंजक सामन्यानंतर अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचला.

हेही वाचा – AFG v BAN: ‘हळू खेळा, पाऊस येतोय’, अफगाणिस्तानच्या कोचचा इशारा आणि गुलबदीन पाय पकडून खाली पडला… पाहा VIDEO

अफगाणिस्तान-बांगलादेश सामन्यावर तीन संघांच नशीब अवलंबून होतं. हा सामना संपण्यापूर्वी अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचे संघही उपांत्य फेरीचे दावेदार होते, परंतु सर्वांनाच झुगारून देत अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करण्यातच यश मिळविले नाही तर प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या गटात भारत पहिल्या स्थानी आहे तर अफगाणिस्तान दुसऱ्या स्थानी आहे. तर दुसऱ्या गटात दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानी आहे पण सेमीफायनलसाठी प्रथम इंग्लंडचा संघ पात्र ठरला होता.

हेही वाचा- IND v AUS: “आम्ही ऑस्ट्रेलियाला ओळखून आहोत…” भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, म्हणाला “आम्हाला जे करायचं होतं”

सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानचे संघ आमनेसामने असतील, तर भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार, हे दोन्ही उपांत्य फेरीचे सामने एकाच दिवशी म्हणजेच २७ जून रोजी खेळवले जातील. पहिल्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे भारतीय वेळेनुसार सकाळी ६ वाजल्यापासून खेळताना दिसतील, तर त्याच दिवशी रात्री ८ वाजल्यापासून भारत आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने येतील. हे सामने जिंकणारा संघ अंतिम फेरीत जाईल आणि त्यानंतर टी-२० विश्वचषकाचा रोमांचक अंतिम सामना होईल.

हेही वाचा – ऋषभ पंतने सोपा झेल सोडल्याचे पाहता रोहितने भर मैदानात घातली शिवी, रागाने लालबुंद झालेल्या कॅप्टनचा VIDEO व्हायरल

टी-२० विश्वचषक २०२४ सेमीफायनलचे वेळापत्रक


सेमी फायनल १ – दक्षिण आफ्रिका वि अफगाणिस्तान – २७ जून २०२४ -सकाळी ६ वाजता – त्रिनिदाद
सेमी फायनल २ – भारत वि इंग्लंड – २७ जून २०२४ – रात्री ८ वाजता – गयाना

अंतिम सामना – २९ जून २०२४
सेमी फायनल १ चा विजेता वि सेमी फायनल २ चा विजेता – संध्याकाळी ६ वाजता – बार्बाडोस