लॉडरहिल (फ्लोरिडा) : भारतीय संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपला ‘अ’ गटातील अखेरचा सामना शनिवारी कॅनडाविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात विराट कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. आतापर्यंत भारताने खेळलेल्या तीन पैकी तीन सामन्यांत विजय मिळवत ‘सुपर एट’ गटातील आपले स्थान निश्चित केले आहे. या गटातील सर्व सामने आता वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून खेळताना कोहलीने ७००हून अधिक धावा केल्या होत्या. मात्र, ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चमक दाखवता आलेली नाही. त्याला तीन सामन्यांत केवळ पाच धावाच करता आल्या आहेत. अमेरिकेविरुद्ध तो पहिल्याच चेंडूवर गारद झाला. त्यामुळे या सामन्यात त्याच्याकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. दुसरीकडे, कॅनडाने आयर्लंडला १२ धावांनी नमवत आपली क्षमता दाखवली. सलामी फलंदाज आरोन जॉन्सनसारखे फलंदाज भारताच्या अडचणी वाढवू शकतात. मात्र, कॅनडाला भारतासारख्या मजबूत संघाला पराभूत करणे सोपे नसेल.

हेही वाचा >>> Euro 2024 : अनुभवाला तरुणाईचे आव्हान; आज युरो फुटबॉलमध्ये क्रोएशिया-स्पेन एकमेकांसमोर

रोहित, पंत, सूर्यकुमारवर भिस्त

कर्णधार रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करणारा कोहली लवकर बाद झाल्याने संघाची सुरुवात मिळालेली नाही. त्यामुळे नंतर येणाऱ्या फलंदाजांवर दबाव निर्माण होत आहे. ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांनी संघासाठी निर्णायक कामगिरी केली आहे. पंतने आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्ध अनुक्रमे ३६ व ४२ धावा केल्या आहेत. सूर्यकुमारने खराब सुरुवातीनंतर अमेरिकेविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. शिवम दुबेनेही या सामन्यात ३१ धावा केल्या. यशस्वीला या सामन्यात संधी मिळाल्यास तो डावाची सुरुवात करेल आणि त्यामुळे कोहली पुन्हा तिसऱ्या स्थानी फलंदाजीस येऊ शकतो. जसप्रीत बुमरा (पाच बळी), हार्दिक पंड्या (सात बळी) आणि अर्शदीप सिंग (सात बळी) यांनी गोलंदाजीत चमक दाखवली आहे.

● वेळ : रात्री ८ वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, , १ हिंदी, हॉटस्टार अॅप.

सामन्यावर पावसाचे सावटभारतीय संघाची अपेक्षा असेल, की सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ नये. फ्लोरिडाच्या अनेक भागात सातत्याने पाऊस पडत आहे. त्यातच सामन्यादरम्यानही पाऊस पडण्याची शक्यता आहे. लॉडरहिल मियामीपासून जवळपास ५० किमी दूर आहे. मियामी येथे झालेल्या पावसामुळे तेथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या आयोजकांसाठी ही चिंतेची बाब असू शकते.