टी२० विश्वचषकातील दोन्ही सामन्यांत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंतची अनुपस्थिती खूपच चर्चेत राहिली आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध, भारताने पंतऐवजी दिनेश कार्तिकला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळवले. रविवारी पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी, भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या मते कार्तिकच्या खराब विकेटकीपिंगमुळे पंतला संधी देण्याची गरज आहे, असे मत त्यांनी मांडले.

कार्तिकने आयपीएल २०२२ मध्ये आरसीबीसाठी यष्टीरक्षकाची भूमिका बजावली होती. जेव्हा ३७ वर्षीय अनुभवी यष्टीरक्षकाने भारतीय संघासाठी पुनरागमन केले तेव्हापासून, त्याने भारतासाठी काही संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत, त्यामुळे त्याची सर्वोत्तम ‘फिनिशर’ म्हणून ओळख निर्माण झाली. कार्तिक पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दबावाला बळी पडला आणि नेदरलँड्सविरुद्ध खेळताना देखील त्याने त्याच चुका पुन्हा केल्या, त्यामुळेच कपिल देव यांना दिनेश कार्तिकच्या जागी ॠषभ पंत हवा आहे. तसेच मधल्या फळीत डावखुरा फलंदाज असल्यास भारताला कसा फायदा होऊ शकतो याकडे ही त्यांनी लक्ष वेधले.

कपिल देव एबीपी न्यूजशी संवाद साधताना म्हणाले, ” भारताला आता ऋषभ पंतची गरज आहे. दिनेश कार्तिक त्याला दिलेले यष्टिरक्षणाचे आणि फिनिशरचे काम पूर्ण करेन असे वाटले होते, परंतु घडलेल्या घटनांचा विचार  करता मला वाटते की टीम इंडियाकडे पंतच्या रूपाने डावखुरा फलंदाज उपलब्ध आहे संघाने या पर्यायाकडे आवर्जून पाहावे, त्याच्या समावेशाने संघ परिपूर्ण दिसेल.”

हेही वाचा :  T20 World Cup: पाकिस्तानच्या मदतीला धावला बांगलादेश! झिम्बाब्वेचा अवघ्या तीन धावांनी पराभव 

भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील आणखी एका खेळाडूच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. खरेतर, पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध सलामीच्या फलंदाजाच्या कमी धावसंख्येमुळे पंतला राहुलच्या जागी स्थान देण्याची चर्चा सुरु आहे. मात्र कपिल देव यांनी भारतीय सलामीवीरांचे समर्थन केले आहे आणि त्यांना पॉवरप्लेमध्ये वेळ घेण्यास सुचवले आहे. कपिल देव म्हणतात, “रोहित आणि राहुल यांनी वेळ घेऊन खेळपट्टीचा अंदाज ओळखत फलंदाजी करावी आणि नंतर मोठे फटके मारावेत. विरोधी संघाविरुद्ध ते आक्रमक पवित्रा स्वीकारू शकतात.”

हेही वाचा :   T20 World Cup: ‘पाकिस्तानला हरवणे इतके…!’, नेदरलँड्सच्या प्रशिक्षकांनी बाबर आझम अँण्ड कंपनीला डिवचले

याविषयी बोलताना कपिल देव म्हणतात, “राहुल हा तांत्रिक दृष्ट्या क्रिकेट खेळणारा क्रिकेटपटू आहे. जर तुम्ही त्याला फलंदाजी करताना पाहिले असेल तर तो संघर्ष करताना दिसत नाही. तो जरी बाद झाला असेल तरी केवळ २-३ सामन्यातील त्याच्या खेळीवर तुम्ही त्याची योग्यता ठरवू शकत नाही. त्याने धावा कराव्यात अशी माझी देखील इच्छा आहे आणि ते संघासाठी ही महत्त्वाचे आहे. काही खेळाडूंना जलद खेळू नका असे सांगितले जाते. मात्र राहुल सुरुवातीला वेळ घेऊन खेळू शकतो आणि नंतर तो आवश्यकतेनुसार सहज वेग वाढवू शकतो.पहिली ८-१० षटके त्याने संयमाने खेळावीत आणि नंतर गरजेनुसार आणि खेळपट्टीचा अंदाज घेत वेग वाढवून मोठी धावसंख्या उभारावी ही माझी इच्छा आहे.”