टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सुपर ८ च्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अफगाणिस्तानच्या संघाने प्रथमच ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यांच्या या विजयानंतर आता क्रिकेट विश्वातून त्यांचे कौतुक केलं जातं आहे. दरम्यान, अफगाणिस्तानच्या या कामगिरीनंतर आता तालिबान सरकारनेही त्यांचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा – Afghanistan vs Bangladesh: अफगाणिस्तानने घडवला इतिहास; बांगलादेशला हरवत सेमी फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलिया माघारी

तालिबान सरकारमधील परराष्ट्र मंत्री अमीर खान मुट्टाकी यांनी अफगाणिस्तान संघाचा कर्णधार रशीद खानबरोबर व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने यासंभाषणाचा व्हि़डीओ शेअर केला आहे. हे संपूर्ण संभाषण पश्तो भाषेत असून या व्हिडीओत अमीर खान मुट्टाकी यांनी बांगलादेशविरुद्धच्या सामान्यात मिळवलेल्या विजयाबद्दल रशीद खानच्या शिलेदारांचं अभिनंदन केलं आहे. तसेच त्यांनी उपांत्य फेरीतील समान्यासाठी अफगाणिस्तान संघाला शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

महत्त्वाचे म्हणजे रशीद खान यानेही या शुभेच्छा स्वीकारत उपांत्य फेरीतील सामन्यात विजय मिळवू असा विश्वास व्यक्त केला आहे. उपांत्य फेरीत अफगाणिस्तान सामना बलाढ्य दक्षिण आफ्रिकाबरोबर होणार आहे. हा सामना २७ जून रोजी खेळवला जाणार असून जो संघ जिंकेल तो थेट अंतिम फेरीत दाखल होणार आहे.

हेही वाचा – “आजचा विजय हा…” अफगाणिस्तानची कामगिरी पाहून क्रिकेटचा देवही भारावला, सचिन तेंडुलकरची अफगाण संघासाठी खास पोस्ट

दरम्यान, आज बांगलादेश विरुद्ध झालेल्या सामान्यात अफगाणिस्तानच्या संघाने शानदार कामागिरी करत विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयाने ऑस्ट्रेलियाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. या सामान्यात अफगाणिस्तानने पुन्हा एकदा आपल्या भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले असून नवीन उल हकने १८व्या षटकात सलग दोन विकेट्स घेत बांगलादेशला ऑल आऊट केलं. तर अफगाणिस्तानाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ११५ धावा केल्या. महत्त्वाचे म्हणजे सततच्या पावसाने या सामन्यात मोठा व्यत्यय आणला. अखेरीस या सामन्याचे एक षटकही कमी केले. मात्र, ११.४ षटकांनंतर पुन्हा पाऊस सुरू झाल्याने डीएलएसनुसार अफगाणिस्तानच्या संघाला विजय घोषित करण्यात आले.