Afghanistan team celebration video after victory : अफगाणिस्तान क्रिकेट संघासाठी २३ जून हा त्यांच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात संस्मरणीय दिवस ठरला. टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ फेरीत अफगाण संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना २१ धावांनी जिंकला. या निकालाची कोणालाच अपेक्षा नव्हती पण अफगाणिस्तान संघाने पुन्हा एकदा आपल्या खेळाने सर्वांना चकीत केले मनंही जिंकली. या सामन्यानंतर अफगाण संघाचा आनंद मैदानावर दिसत असतानाच, स्टेडियमवरून हॉटेलवर परतत असताना संघाने बसमध्ये सेलिब्रेशनही केले, ज्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गोलंदाजी प्रशिक्षक ड्वेन ब्राव्होही बसमध्ये नाचताना दिसला –

टी-२० विश्वचषक २०२४ पूर्वी, अफगाणिस्तान संघाने आपल्या संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होची नियुक्ती केली आहे. या सामन्यादरम्यान ब्राव्होही खूप सक्रिय दिसला, ज्यामध्ये तो सीमारेषेजवळ उभा राहून अफगाण संघाच्या गोलंदाजांना सतत सल्ला देत होता. हा सामना जिंकल्यानंतर त्याचा आनंद मैदानातही स्पष्ट दिसत होता. यानंतर, जेव्हा संघ बसने हॉटेलवर परतत होता, तेव्हा ब्राव्हो आपल्या ‘चाम्पिअन-चाम्पिअन’ या हिट गाण्यावर अफगाणिस्तान संघासोबत नाचतानाही दिसला. या संपूर्ण सेलिब्रेशनचा व्हिडीओ अफगाणिस्तान संघाचा स्टार खेळाडू मोहम्मद नबी याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

एक संघ आणि देश म्हणून आमच्यासाठी मोठा विजय –

या स्पर्धेत अफगाणिस्तान संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत असलेल्या रशीद खानने या ऐतिहासिक विजयावर प्रतिक्रिया दिली. विजयानंतर रशीदने म्हणाला की, “एक संघ आणि एक देश म्हणून आमच्यासाठी हा मोठा विजय आहे. ही एक अद्भुत अनुभूती आहे, ज्याची गेल्या दोन वर्षांपासून आम्हाला उणीव भासत होती. या विजयाने मी खूश आहे आणि माझ्या खेळाडूंचा अभिमान आहे. या विकेटवर १४८ धावांची धावसंख्या चांगली होती. पण आम्ही फलंदाजीमध्ये तशी कामगिरी करू शकलो, ज्या प्रकारे आम्ही करु शकलो असतो.”

हेही वाचा – Virat Kohli : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात असं काय घडलं, ज्यामुळे विराट स्टेजखाली घुसला, पाहा VIDEO

हा आमच्यासाठी आणि आमच्या देशासाठी अभिमानाचा क्षण –

रशीद खान पुढे म्हणाला, “आमच्या सलामीच्या फलंदाजांनी आम्हाला चांगली सुरुवात करून दिली. यानंतरही आम्ही स्वतःवर विश्वास ठेवला. आम्ही या क्षणाची बराच काळापासून वाट पाहत होतो. हा आमच्यासाठी आणि आमच्या देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. आमच्या क्रिकेटसाठी मिळालेले हे खूप मोठे यश आहे. अखेर ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात आम्हाला यश आले. क्रिकेटमधील आमचा इतिहास समृद्ध नाही. त्यामुळे हा विजय आमच्यासाठी खूप मोठा आहे.”