Frank Nsubuga bowls the best spell in T20 World Cup : टी-२० विश्वचषक २०२४ मधील नववा सामना क गटातील पापुआ न्यू गिनी आणि युगांडा यांच्यात गयानाच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात युगांडाच्या संघाने ३ विकेट्स राखून विजय मिळवला पण दोन्ही संघांकडून अत्यंत खराब फलंदाजी दिसून आली. पापुआ न्यू गिनी संघाने प्रथम फलंदाजी करताना १९.१ षटकांत केवळ ७७ धावा केल्या होत्या, तर युगांडाने हे लक्ष्य १८.२ षटकांत ७ गडी गमावून पूर्ण केले. युगांडासाठी या सामन्यात ४३ वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज फ्रँक न्सुबुगाने आपल्या शानदार गोलंदाजीने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात नवा विक्रम रचला आहे.

फ्रँक न्सुबुगाने टाकला विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट इकॉनॉमिकल स्पेल –

या विश्वचषकातील सर्वात वयोवृद्ध खेळाडू, युगांडाच्या संघाचा भाग असलेला फ्रँक न्सुबुगाने आता टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट इकॉनॉमिकल ४ षटकांचा स्पेल टाकणारा गोलंदाज ठरला आहे. पापुआ न्यू गिनीविरुद्धच्या सामन्यात न्सुबुगाने ने ४ षटकात ४ धावा दिल्या आणि २ विकेट्सही घेतल्या. न्सुबुगापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाच्या नावावर होता, ज्याने याच विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ४ षटकात ४ विकेट्स घेऊन ७ धावा दिल्या होत्या.

टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट स्पेल (४ षटके) टाकणारे गोलंदाज –

फ्रँक न्सुबुगा – ४ धावांत २ विकेट्स (वि. पापुआ न्यू गिनी, २०२४)
एनरिक नॉर्खिया – ७ धावांत ४ विकेट्स (वि. श्रीलंका, वर्ष २०२४)
अजंथा मेंडिस – ८ धावांत ६ विकेट्स (वि. झिम्बाब्वे, २०१२)
महमुदुल्लाह – ८ धावांत १ विकेट (वि. अफगाणिस्तान, २०१४)
वानिंदू हसरंगा – ८ धावांत ३ विकेट्स (वि. यूएई, वर्ष २०२२)

हेही वाचा – T20 WC 2024 : युगांडा संघाने पापुआ न्यू गिनीवर विजय मिळवल्यानंतर केला भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल

या सामन्यात युगांडासाठी रियाजत अली शाह व्यतिरिक्त एकही फलंदाज काही खास करु शकला नाही. त्याने ३३ धावांची खेळी करत संघाला विजयापर्यंत नेले. मात्र, त्याचा स्ट्राईक रेट केवळ ५८.९२ धावाच राहिला. या सामन्यात अल्पेशने आठ धावा, दिनेशने शून्य, जुमा मियागीने १३ धावा, केनेथने नाबाद सात धावा केल्या. ब्रायन खाते न उघडता नाबाद राहिला. पापुआ न्यू गिनीकडून अली नाओ आणि नॉर्मन वानुआ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर चाड सोपर आणि असद वाला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.