Virat Kohli's T20 title celebration with family : भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी पहाटे बार्बाडोसहून दिल्लीला पोहोचला. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली, भारतात परतल्यानंतर, पहिल्यांदा दिल्लीतील हॉटेल आयटीसी मौर्य येथे कुटुंबाबरोबर टी-२० विश्वचषक २०२४ चा विजय साजरा केला. याआधी टीम इंडियाची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने विमानतळावर पोहोचले. चाहत्यांनी संघाचे जोरदार स्वागत केले. यानंतर संपूर्ण टीमचे हॉटेलबाहेर जल्लोषात स्वागत करण्यात आले. बसमधून खाली उतरल्यानंतर काही खेळाडूंनी ढोल-ताशावर ठेका धरला. विराट कोहलीने कुटुंबासह विजय साजरा केला - विराट कोहली हा दिल्लीचा रहिवासी असून तो अंतिम सामन्यात सामनावीर ठरला होता. त्यांनी दिल्लीत पोहोचताच कुटुंबासोबत विजय साजरा केला. त्याची बहीण भावना आणि भाऊ विकास त्याला भेटण्यासाठी हॉटेलवर पोहोचले होते. कोहलीने अंतिम सामन्यात ५९ चेंडूत ७६ धावांची शानदार खेळी केली. अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी ३५ वर्षीय कोहलीची कामगिरी फारशी चांगली नव्हती. कोहलीने पहिल्या सात सामन्यात केवळ ७५ धावा केल्या होत्या. मात्र, स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच डावाची सुरुवात करताना कोहलीने संघाला त्याची सर्वाधिक गरज असताना चांगली कामगिरी केली. विराट कोहलीने सर्वोत्तम कामगिरी केली - भारताने ४.३ षटकात ३४ धावांवर ३ विकेट्स गमावल्यानंतर संघाची धुरा सांभाळली. त्याने आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवतानासंघाला २० षटकात १७६/७ च्या स्पर्धात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या पाच षटकांत केवळ ३० धावांची गरज होती. मात्र, भारतीय वेगवान गोलंदाजांनी आपल्या शानदार गोलंदाजीने सामना फिरवला आणि अखेरीस सात धावांनी विजय मिळवून दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकली. हेही वाचा - Team India Celebration : टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईत जंगी तयारी, वानखेडेवर चाहत्यांना मोफत प्रवेश, पाहा VIDEO टीम इंडिया मुंबईसाठी रवाना - गुरुवारी सकाळी भारतीय संघाची पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर विशेष बैठक पार पडली. यानंतर, संघ मुंबईला रवाना झाला आहे. जिथे बीसीसीआयने नरिमन पॉइंट ते वानखेडेपर्यंत एक किलोमीटरच्या विजय परेडची योजना आखली आहे. जेणेकरून चाहत्यांना टी-२० विश्वचषक ट्रॉफीसह त्यांच्या आवडत्या खेळाडूंची झलक जवळून पाहायला मिळू शकेल. यानंतर प्रतिष्ठेच्या वानखेडे स्टेडियमवर विजेत्या संघाचा गौरवही करण्यात येणार आहे. हेही वाचा - टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींची दीड तास चर्चा, पाहा VIDEO वानखेडे स्टेडियममध्ये चाहत्यांना मोफत प्रवेश - भारतीय क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल बीसीसीआयच्या वतीने वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी हजेरी लावावी यासासाठी आज वानखेडे स्टेडियममध्ये मोफत प्रवेश देण्यात आला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक यांनी ही घोषणा केली आहे. स्टेडियममध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्त्वावर प्रवेश मिळेल.