Ashwin Reacts On Virat Kohli Playing at Number 3: सर्व फॉरमॅटमध्ये भारताचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळख असलेला विराट कोहलीला इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मधील यशस्वी हंगामामुळे वर्ल्ड कपमध्ये सलामीवीर म्हणून पुनरागमन करण्याची संधी मिळाली होती. पण दुर्दैवाने रन-मशीन कोहलीला आयपीएलमधील विक्रमी मोसमानंतर टी-२० विश्वचषकात धावांचा फार मोठा टप्पा अद्याप गाठता आलेला नाही. आयर्लंड, पाकिस्तान आणि यूएसए विरुद्धच्या अलीकडील सामन्यांमध्ये कोहलीने अनुक्रमे केवळ एक, चार आणि शून्य धावा केल्या आहेत. त्यामुळेच भारतीय संघाच्या लाईनअप मध्ये थोडा बदल करावा आणि कोहलीला तिसऱ्या स्थानी पाठवावं अशी मागणी होत आहे. ICC स्पर्धेत भारत टी २० विश्वचषकाच्या पहिल्या सुपर ८ सामन्यात अफगाणिस्तानशी भिडणार आहे. तत्पूर्वी कोहलीला फलंदाजीसाठी तिसऱ्या स्थानी पाठवण्याच्या परिणामांबाबत भारताचा वरिष्ठ खेळाडू रविचंद्रन अश्विन याने भाष्य केलं आहे.

विराट कोहलीसारखा खेळाडू आत्मविश्वास गमावेल का?

कोहलीला सलामीवीर म्हणून धावा काढण्यासाठी झगडावे लागत असल्याने, ऋषभ पंतला बढती देऊन भारत आपल्या क्रमवारीत बदल करू शकतो किंवा यशस्वी जैस्वालला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी खेळवता येऊ शकते. दोन्ही परिस्थितींमध्ये, कोहली त्याचा फलंदाजीसाठी सर्वाधिक पसंतीचा क्रमांकावर म्हणजे तिसऱ्या स्थानी खेळण्यास भाग असेल. तर अश्विन आपल्या युट्यूब चॅनेलवर याविषयी प्रतिक्रिया देताना म्हणाला की, असं केल्याने विराट कोहलीसारख्या खेळाडूचा आत्मविश्वास कमी होईल किंवा त्याचं खच्चीकरण होईल हे शक्यच नाही. उलट तो म्हणेल, ‘तुम्ही मला तिसऱ्या क्रमांकावर आणले, मी कोण आहे ते मी तुम्हाला दाखवून देईन. मी त्याला ओळखतो म्हणूनच हे सांगतोय”.

कोहलीने २०२४ च्या आयपीएलमध्ये ७४१ धावा केल्या होत्या. पण टी २० विश्वचषकात त्याला आतापर्यंत अवघ्या पाच धावा करता आल्या आहेत. T20 विश्वचषकात गोल्डन डकवर बाद होण्याचा नकोसा विक्रम सुद्धा कोहलीने केलाय. पाकिस्तानच्या बाबर आझमने कोहलीला मागे टाकत सध्या , जो T20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असा मान मिळवलाय. अर्थात भारताच्या माजी कर्णधाराला T20I मध्ये पुन्हा हे स्थान प्राप्त करण्यासाठी फक्त १०४ च धावांची गरज आहे, जे कोहलीसाठी निश्चितच कठीण नाही.

अश्विनसह चर्चेत रॉबिन उथप्पानेही अनुमोदन देत म्हटले की, “विराट कोहलीचं चालणं, बोलणं, वागणं यातही आत्मविश्वास झळकतो. मला मध्ये एकदा मैदानात त्याची एक झलक दिसली, तो खेळाडूंशी बोलत होता, सपोर्ट स्टाफसह चर्चा करत होता, त्यातूनच दिसून येत होतं की या माणसाकडे कमालीचा आत्मविश्वास आहे. त्याला स्वतःच्या खेळाबाबत व क्षमतेबद्दल माहित आहे.”

हे ही वाचा<< “मला रंगांधळा म्हणत त्यांनी..”, सौरभ नेत्रावळकरने सांगितला भारत सोडण्याआधीचा किस्सा; म्हणाला, “दोन वर्षं मागितली..”

जर विराट कोहलीला तिसऱ्या स्थानी खेळण्याची संधी दिली तर कामगिरीत नेमका काय बदल दिसून येईल? याबाबत तुमचं काय मत आहे, हे कमेंट करून नक्की कळवा.