नव्या चेंडूने फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या शाहीन आफ्रिदीने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना हैराण केले आहे. अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या सामन्यादरम्यान शाहीनने असाच एक खतरनाक यॉर्कर टाकला, ज्याचे उत्तर अफगाणिस्तानचा फलंदाज रहमानउल्ला गुरबाजकडे नव्हते. त्यामुळे तो जखमी झाला.

रहमानुल्ला गुरबाज रुग्णालयात दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, रहमानउल्लाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. जेथे त्याच्या डाव्या पायाचे स्कॅनिंग करण्यात आले. अफगाणिस्तान संघासोबतच त्यांच्या चाहत्यांसाठी ही मोठी चिंतेची बाब आहे. त्यांच्या विश्वचषक मोहिमेबद्दल बोलायचे तर, अफगाणिस्तानला आपला पहिला सामना शनिवारी इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे. अफगाणिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडसह ग्रुप १ मध्ये आहे.

पहिल्याच षटकात शाहीनचा यॉर्कर आला

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शाहीन शाह आफ्रिदीने असा धोकादायक यॉर्कर टाकला, जो यष्टीरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाजला समजला नाही. त्यामुळे त्याला स्वत:ला सावरता न आल्याने चेंडू सरळ जाऊन त्याच्या डाव्या पायाच्या बोटाला लागला. या चेंडूवर गुरबाज केवळ आऊट झाला नाही, तर त्याला वेदना देखील होत होत्या. वेदना इतक्या तीव्र होत्या की, गुरबाजला मैदानाबाहेर जाण्यासाठी चालता येत नव्हते. ज्यामुळे त्याला पाठीवर उचलून घेऊन जावे लागले.

शाहीनचा पहिला स्पेल होता धोकादायक

या सामन्यात शाहीनने ४ षटकात २९ धावा दिल्या आणि २ बळी घेतले. तथापि, त्याचा पहिला स्पेल अधिक धोकादायक होता. ज्यामध्ये त्याने २ षटकांच्या गोलंदाजीत रहमानुल्ला गुरबाज आणि हजरतुल्ला झाझाई यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हे दोन्ही फलंदाज अफगाणिस्तानच्या फलंदाजीचा कणा मानले जातात.