Delhi Police Interrogates New York Police after IND vs PAK Match : अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे रविवारी झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर भारतात जल्लोषाचे वातावरण होते. यादरम्यान दिल्ली पोलिसांनी एक ट्विट केले, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावर सोशल मीडिया यूजर्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. या ट्विटला आतापर्यंत ७.३२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३७ हजार लोकांनी पोस्टला लाइक केले आहे. तसेच ६.६ हजार वेळा रिट्विट करण्यात आले आहे. युजर्स पोस्टवर भरभरून कमेंटही करत आहेत.

न्यूयॉर्क पोलीस विभागाला (NYPD) टॅग करत दिल्ली पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की ‘सामन्यानंतर फक्त दोनच आवाज येत होते. एक ‘इंडिया… इंडिया’ आणि दुसरा बहुधा तुटलेल्या टेलिव्हिजनचा. तुम्ही कृपया पुष्टी करू शकता?’

ही पोस्ट सोमवारी सकाळी करण्यात आली. ज्याला लोक खूप पसंत करत आहेत. हे पाहून लोकांना हसू आवरता येत नाही. भारत आणि पाकिस्तान सामन्याबाबत दिल्ली पोलिसांनी केलेले हे पहिले ट्विट नाही. खरे तर सामन्यापूर्वी दिल्ली पोलिसांनीही टीम इंडियाचे अभिनंदन केले होते.

दिल्ली पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते, ‘प्रिय एवायपीडी न्यूज, फक्त तुम्हाला कळवण्यासाठी, आज नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर एक मनोरंजक लढत अपेक्षित आहे. टीम इंडियाला खूप खूप शुभेच्छा.’

सामन्यात काय घडलं?

टी-२०- विश्वचषक २०२४ चा १९ वा सामना रविवारी कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये खेळला गेला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने १९ षटकांत १० गडी गमावून ११९ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ २० षटकांत ७ गडी गमावून ११३ धावाच करू शकला. जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीमुळे रोहित शर्माच्या सेनेने सामना सहा धावांनी जिंकला. या सामन्यात वेगवान गोलंदाजाने एकूण तीन विकेट्स घेतल्या. त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये ३.५० च्या इकॉनॉमी रेटने केवळ १४ धावा दिल्या आणि सामना भारताच्या बाजूने वळवला. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

हेही वाचा – VIDEO : ‘भाई ये क्या कर दिया…’, सिराजने मुद्दाम रिझवानला चेंडू मारला? चाहत्यांच्या प्रतिक्रिया व्हायरल

टीम इंडियाने सर्वात लहान धावसंख्येचा केला यशस्वी बचाव –

टी-२० विश्वचषकात भारताने सर्वात लहान धावसंख्येचा यशस्वी बचाव केला आहे. या बाबतीत भारताने श्रीलंकेची बरोबरी केली. दोघांनी १२० धावांच्या लक्ष्याचा बचाव केला आहे. श्रीलंकेने २०१४ च्या टी-२० विश्वचषकात चितगाव येथे न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती. त्याच वेळी, भारतीय संघाने टी-२० मध्ये यशस्वी बचाव केलेली ही सर्वात लाहन धावसंख्या आहे. यापूर्वी टीम इंडियाने २०१६ मध्ये हरारे येथे झिम्बाब्वेसमोर १३९ धावांच्या लक्ष्याचा बचाव केला होता.