T20 World Cup 2024 Semi Final IND v ENG: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी-२० विश्वचषक २०२४ च्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. यासह भारतीय संघ उपांत्य फेरीत इंग्लंडशी भिडणार हेही निश्चित झाले आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. अफगाणिस्तानचा उपांत्य फेरीतील सामना त्रिनिदाद येथे होणार आहे. तर भारताचा उपांत्य फेरीतील सामना गयाना मध्ये होणार आहे. दोन्ही उपांत्य फेरीचे सामने २७ जून रोजी होणार आहेत. तर यादिवशी गयाना येथे पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याची चिन्हे आहेत. पावसामुळे भारताचा उपांत्य फेरीतील सामना जर रद्द झाला तर कोणता संघ फायनलमध्ये पोहोचणार जाणून घ्या.

भारतीय संघ २७ जून रोजी गयाना येथे उपांत्य फेरीचा सामना खेळताना दिसणार आहे. जिथे इंग्लंडचा संघ प्रतिस्पर्धी असेल. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता हा सामना खेळवला जाईल. नाणेफेक सुमारे अर्धा तास आधी, म्हणजे ७.२० वाजता होईल. तत्पूर्वी या दिवशी पहिला उपांत्य सामना सकाळी ६ वाजता खेळवला जाणार आहे. पण विशेष म्हणजे दोन्ही उपांत्य फेरीसाठी वेगवेगळे नियम असतील. पहिल्या उपांत्य फेरीसाठी आयसीसीने राखीव दिवसाची तरतूद केली आहे. म्हणजे सामन्यात पाऊस पडला तर दुसऱ्या दिवशी खेळवला जाईल. मात्र भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.

हेही वाचा – AFG v BAN: ‘हळू खेळा, पाऊस येतोय’, अफगाणिस्तानच्या कोचचा इशारा आणि गुलबदीन पाय पकडून खाली पडला… पाहा VIDEO

भारत इंग्लंड सेमीफायनलाल राखीव दिवस आहे की नाही?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही कारण त्यानंतर दुस-याच दिवशी म्हणजे २९ जूनच्या संध्याकाळी अंतिम सामना खेळवला जाईल. दरम्यान, दोन्ही उपांत्य फेरीसाठी २५० मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला असल्याची माहिती आयसीसीने दिली आहे. म्हणजे पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्यास पुन्हा सामना सुरू होण्यासाठी सुमारे चार तासांचा वेळ असेल.

हेही वाचा – IND v AUS: “आम्ही ऑस्ट्रेलियाला ओळखून आहोत…” भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, म्हणाला “आम्हाला जे करायचं होतं”

नियमांनुसार, पहिल्या उपांत्य फेरीत आणखी ६० मिनिटे खेळ वाढवणे आवश्यक असल्यास ते केले जाईल. जर सामना राखीव दिवशी झाला तर त्या दिवशी १९० अतिरिक्त मिनिटे दिली जातील. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत, भारताच्या सामन्याच्या दिवशी २५० मिनिटे अतिरिक्त देण्याची व्यवस्था केली आहे. इतकेच नव्हे तर भारताचा उपांत्य फेरीतील सामना हा काहीही झाल्यास २७ तारखेला रात्री ८ वाजताच खेळवला जाईल, असा नियम आयसीसीने सुरूवातीलाच केला होता. भारताचे वर्ल्डकपमधील सर्व सामने हे प्राईम टाईममध्ये खेळवले गेले, जेणेकरून ब्रॉडकास्टर्ससह सर्वांनाच फायदा होतो.

हेही वाचा – ऋषभ पंतने सोपा झेल सोडल्याचे पाहता रोहितने भर मैदानात घातली शिवी, रागाने लालबुंद झालेल्या कॅप्टनचा VIDEO व्हायरल

भारत विरुद्ध इंग्लंड आणि अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही सामन्यांवर पावसाचे सावट आहे. हे दोन्ही सामने खेळवले जातील असा सर्वांचा प्रयत्न असेल परंतु जर स्थिती खूपच खराब झाली तर दोन्ही सामन्यांमध्ये जो संघ त्यांच्या गटात अव्वल असेल तो अंतिम फेरीत जाईल. अशा स्थितीत टीम इंडिया सामना न खेळता थेट फायनलमध्ये जाईल. तर दुसऱ्या गटातील दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीत जाण्याचा दावेदार असेल. फायनल न झाल्यास दोन्ही फायनलमध्ये पोहोचलेल्या संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल, असेही कळवण्यात आले आहे.