कॅरेबियन बेटं आणि अमेरिकेत सुरू असलेल्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडला अनपेक्षितपणे प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. जेतेपदाचे दावेदार असलेल्या किवी संघावर अचानकच मायदेशी परतण्याची वेढ ओढवली. २०१४ नंतर पहिल्यांदाच आयसीसीतर्फे आयोजित स्पर्धेत न्यूझीलंडचं आव्हान प्राथमिक फेरीत संपुष्टात आलं आहे. या धक्कादायक पराभवाचे पडसाद आता न्यूझीलंड क्रिकेटविश्वात उमटू लागले आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने न्यूझीलंड क्रिकेट बोर्डातर्फे करण्यात येणारा वार्षिक करार नाकारला आहे. याबरोबरीने केनने न्यूझीलंडच्या वनडे आणि टी२० संघाचं कर्णधारपदही सोडलं आहे. दोन्ही निर्णय न्यूझीलंड संघाच्या आगामी वाटचालीवर मूलगामी परिणाम करणारे आहेत. केनच्या नेतृत्वातच न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं जेतेपद पटकावलं होतं. केनच्या नेतृत्वातच न्यूझीलंड संघाने २०१९ वनडे वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

केनच्या बरोबरीने वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसननेही राष्ट्रीय करार नाकारला आहे. टी२० वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडच्या शेवटच्या गटवार लढतीत फर्ग्युसनने पापुआ न्यू गिनी संघाविरुद्ध ४ षटकात एकही धाव न देता ३ विकेट्स पटकावण्याचा विक्रम केला. फर्ग्युसननेही न्यूझीलंड संघ हे प्राधान्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. वर्षभरापूर्वी न्यूझीलंडचं अस्त्र असलेला वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, अष्टपैलू जेमी नीशाम आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांनीही वार्षिक करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
Saurabh Netravalkar Exclusive Interview
“मला रंगांधळा म्हणत त्यांनी..”, सौरभ नेत्रावळकरने सांगितला भारत सोडण्याआधीचा किस्सा; म्हणाला, “दोन वर्षं मागितली..”
SA beat USA by 18 Runs,
T20 WC 2024: अमेरिका जिंकता जिंकता हरली; अँड्रियस गौसची झुंज अपयशी
Saurabh Netravalkar Straight Answer About Working After T20 World Cup
सुपर ८ फेरी गाठताच सौरभ नेत्रावळकरने कंपनीत केला कॉल; मॅचनंतर काम करण्याबाबत स्पष्टच म्हणाला, “मला कुणी त्रास..”
Why Team India Players Are Wearing Black Armbands In Super 8 Clash
IND vs AFG सामन्यात भारतीय संघ हातावर काळी पट्टी बांधून का उतरला? BCCI ने सांगितलं नेमकं कारण
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा वार्षिक करार काय असतो?
न्यूझीलंड पुरुष क्रिकेटपटूंना प्रति टेस्ट ५ लाख, वनडेसाठी २ लाख तर टी२० खेळण्यासाठी १.२० लाख एवढं मानधन मिळतं. भारतीय खेळाडूंच्या तुलनेत न्यूझीलंडच्या खेळाडूंचं मानधन कमी आहे. केन विल्यमसनसारख्या मोठया खेळाडूला करारबद्ध झाल्यानंतर दरवर्षी अडीच कोटी रुपये मानधन मिळतं. यामध्ये टी२० लीगमधून मिळणाऱ्या मानधनाचा समावेश नाही.

करारबद्ध झाल्यास काय अटी शर्ती असतात?
न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड दरवर्षी ठराविक खेळाडूंशी वार्षिक करार करतं. करारबद्ध खेळाडूंना मानधन मिळतं. करारबद्ध झालेल्या खेळाडूंचाच प्राधान्याने राष्ट्रीय संघाच्या निवडीवेळी विचार होतो. करारबद्ध झालेल्या खेळाडूंना न्यूझीलंडसाठी टेस्ट, वनडे आणि टी२० खेळण्यासाठी तय्यार राहावं लागतं. दुखापती किंवा वैयक्तिक अडचण हा अपवाद वगळला तर न्यूझीलंडचा संघ जेव्हाही खेळतो तेव्हा खेळण्यासाठी उपलब्ध राहणं ही करारबद्ध खेळाडूची जबाबदारी असते. एकदा करारबद्ध झाल्यानंतर न खेळण्याचा पर्याय त्यांच्याकडे नाही.

खेळाडू न्यूझीलंड बोर्डाचा वार्षिक करार का नाकारत आहेत?
करारबद्ध झाल्यानंतर वर्षभर न्यूझीलंडसाठी खेळणं अनिवार्य होतं. आयपीएलच्या धर्तीवर जगभर टी२० लीग सुरू झाल्या आहेत. या लीगमध्ये खेळून चांगला पैसा मिळतो. पण या लीगमध्ये खेळण्यासाठी वेळ आवश्यक असतो. मात्र राष्ट्रीय संघाचे दौरे, सामने असल्यामुळे खेळाडू लीगमध्ये मनाजोगतं सहभागी होऊ शकत नाही. वर्षभराच्या बांधिलकीपेक्षा महिनाभर एखाद्या टी२० लीगमध्ये खेळून चांगला पैसा मिळत असेल तर या विचारातून न्यूझीलंडचे खेळाडू राष्ट्रीय करार नाकारत आहेत. लीगसाठी ठराविक महिन्याची उपलब्धता दिल्यानंतर उर्वरित वेळ ते आपल्या कुटुंबीयांना देऊ शकतात. घर चालवण्यासाठी आवश्यक पैसे, सोयीसुविधा आणि मोजकंच खेळणं यामुळे वार्षिक करार न स्वीकारणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे.

कुटुंबाला वेळ हे आहे कारण?
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिलेला राष्ट्रीय करार स्वीकारला तर वर्षभर न्यूझीलंडसाठी खेळत राहावं लागतं. त्यामुळे घरच्यांना पुरेसा वेळ देता येत नाही. प्रत्येक दौऱ्यावर म्हणजे विदेशात खेळताना घरच्यांना नेऊ शकत नाही. केन विल्यमसन आणि पत्नीला तीन मुलं आहेत. दोन मुली आणि एक मुलगा यांना वेळ देण्यासाठी केनने हा निर्णय घेतला आहे. ट्रेंट बोल्ट यालाही तीन मुलं आहेत. त्यांना पुरेसा वेळ देता यावा यासाठी ट्रेंटने वार्षिक कराराला नकार दिला.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा राष्ट्रीय करार कोणी कोणी नाकारला आहे?
डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ. टेस्ट, वनडे आणि टी२० अशा तिन्ही प्रकारात बोल्टची हूकूमत आहे. डावाच्या पहिल्याच षटकात प्रतिस्पर्धी फलंदाजांना माघारी धाडण्यात त्याचा हातखंडा आहे. बोल्टने कुटुंबीयांना वेळ देण्यासाठी तसंच जगभरात टी२० लीगमध्ये खेळण्याच्या विचारातून त्याने न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा वार्षिक करार नाकारला. बोल्ट आयपीएलसह जगभरात आयोजित होणाऱ्या टी२० लीगमध्ये नियमित खेळतो. बोल्टने न्यूझीलंडसाठी खेळताना निवृत्ती स्वीकारली नाही. मालिकेनिहाय विचार करुन उपलब्धता सांगेन असं बोल्टने न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला सूचित केलं. पण वार्षिक करार यादीत नाव नसल्याने बोल्टचा राष्ट्रीय संघाच्या निवडीवेळी प्राधान्याने विचार होणार नाही असं बोर्डाने स्पष्ट केलं. सध्या सुरू असलेल्या टी२० वर्ल्डकपसाठी मात्र बोर्डाने स्वत:चं धोरण बाजूला ठेवत बोल्टचा संघात समावेश केला. बोल्टने लौकिकाला साजेशी कामगिरी केली पण न्यूझीलंडला घरी जाण्यापासून तो रोखू शकला नाही.

बोल्टच्या निर्णयातून बोध घेत अष्टपैलू खेळाडू जेमी नीशाम आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांनीही करारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. आक्रमक फटकेबाजी, उपयुक्त मध्यमगती गोलंदाजी आणि अफलातून क्षेत्ररक्षक असलेला नीशाम संघाला संतुलन मिळवून देतो. कॉलिन डी ग्रँडहोम हाही उपयुक्त अष्टपैलू खेळाडू आहे. कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी, मध्यमगती गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षक यामुळे ग्रँडहोम संघात असणं जमेची बाजू होती. पण त्यानेही राष्ट्रीय संघाऐवजी टी२० लीगना आणि कुटुंबाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.

केन-लॉकी जगभरात कुठे कुठे खेळतात?

केन विल्यमसन आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स संघासाठी खेळतो. याआधी तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता. कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत तो बार्बाडोस रॉयल्स संघाकडून खेळतो.

लॉकी फर्ग्युसनने आयपीएल स्पर्धेत रायझिंग सुपरजायंट्स संघाकडून खेळायला सुरुवात केली. त्यानंतर तीन वर्ष तो कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळला. त्यानंतर तो गुजरात टायटन्स संघाच्या ताफ्यात दाखल झाला. एक वर्ष पुन्हा कोलकाताचं प्रतिनिधित्व केल्यानंतर लॉकी आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळतो. टी२० स्पर्धेत तो मँचेस्टर ओरिजिनल्स आणि वेल्श फायर संघांकडून खेळला आहे. अमेरिकेत होत असलेल्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत लॉकी लॉस एंजेलिस नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधित्व करतो.