अहमदाबाद : कसोटी सामन्यांमध्ये अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागू नये यासाठी आता प्रायोगिक तत्त्वावर गुलाबी चेंडूच्या वापरास परवानगी देण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वार्षिक बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच कसोटीत ‘ड्रिंक्स ब्रेक’दरम्यान प्रशिक्षकांना मैदानात येऊन खेळाडूंशी चर्चा करण्याची यापुढे मुभा असेल.

अहमदाबाद येथे झालेल्या ‘आयसीसी’च्या दोनदिवसीय बैठकीत ‘क्रिकेट कॅनडा’चे सदस्यत्व भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तात्काळ निलंबित करण्याचा आणि बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या आगामी निवडणुकांवर देखरेख ठेवण्यासाठी ‘आयसीसी’ अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

कसोटीत आता अंधूक प्रकाशात गुलाबी चेंडूने सामना सुरू ठेवता येणार आहे. ‘आयसीसी’च्या निवेदनानुसार, कसोटी सामना नेहमीप्रमाणे लाल चेंडूने सुरू होईल. मात्र, अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबण्याची शक्यता निर्माण झाल्यास आणि दोन्ही संघांची पूर्वसंमती असल्यास, उर्वरित षटके प्रकाशझोतात गुलाबी चेंडूने खेळवता येतील.

म्हणजेच, दिवसातील नियोजित ९० षटकांपैकी ७५ षटके पूर्ण झाल्यानंतर प्रकाश कमी झाल्यास उर्वरित १५ षटके गुलाबी चेंडूने खेळवता येणार आहेत. अंधूक प्रकाशामुळे खेळाचे नुकसान कमी करण्यासाठी ‘आयसीसी’ आणि मेरिलिबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) संयुक्तपणे प्रकाशयोजना तंत्रज्ञानावरील संशोधन व विकास प्रकल्पांना निधी देणार आहे.

हॉक-आयचा वापर : बेकायदेशीर गोलंदाजी शैलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचांना आता हॉक-आय तंत्रज्ञानातील माहितीचा वापर करता येणार आहे. त्यामुळे संशयास्पद गोलंदाजी शैलीचे अधिक अचूक मूल्यमापन शक्य होईल.