Mitchell Starc Replaces Jasprit Bumrah ICC Test Rankings: कसोटी क्रिकेटमधील वर्ल्ड नंबर वन गोलंदाजाचा ताज जसप्रीत बुमराहकडून हिरावला गेला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ICCच्या पुरुष कसोटी गोलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेत कारकिर्दीत पहिल्यांदाच अव्वल स्थान पटकावलं आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ICCच्या पुरुष कसोटी गोलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेत कारकिर्दीत पहिल्यांदाच अव्वल स्थान पटकावलं आहे.

बुमराहने फेब्रुवारी २०२४ मध्ये पहिल्यांदा क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं होतं. त्यानंतर जवळपास दोन वर्षे त्याचं या स्थानावर वर्चस्व राहिलं. मात्र, श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत बुमराह सहभागी नसलयाने स्टार्कने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करत क्रमवारीच्या शिखरावर धडक मारली.

मॅके येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत स्टार्कने बांगलादेशविरुद्ध भेदक गोलंदाजी करत सामन्यात तब्बल १० विकेट्स घेतल्या. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे त्याने ताज्या क्रमवारीत दोन स्थानांची झेप घेत बुमराह आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री यांना मागे टाकलं.

३६ वर्षांच्या मिचेल स्टार्कसाठी हे मोठं यश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १५ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने सातत्याने अव्वल १० गोलंदाजांमध्ये स्थान मिळवलं आहे. अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडविरुद्ध दमदार कामगिरी केल्यानंतर तो अलीकडेच टॉप-३ मध्ये पोहोचला होता. मात्र, क्रमवारीतील अव्वल स्थान त्याच्यापासून दूरच राहिलं होतं. आता अखेर स्टार्कने कसोटी क्रिकेटमधील नंबर-१ गोलंदाज होण्याचा मान मिळवला आहे.

स्टार्क अव्वल स्थानी पोहोचल्यामुळे जसप्रीत बुमराह दुसऱ्या क्रमांकावर, तर मॅट हेन्री तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या इतर गोलंदाजांनीही क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. कर्णधार पॅट कमिन्सने मॅके कसोटीत सहा विकेट्स घेतल्यानंतर त्याने चौथ्या स्थानावर मजल मारली आहे. तर अनुभवी फिरकीपटू नॅथन लायनने दोन स्थानांची झेप घेत पुन्हा टॉप-१०मध्ये प्रवेश केला असून तो १०व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

फलंदाजीतील क्रमवारी

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीत भारताच्या फलंदाजांना फायदा झाला. इंग्लंडच्या हॅरी ब्रुकने ८७४ रेटिंगसह अव्वल स्थान कायम राखलं आहे. दरम्यान, ऋषभ पंतने उल्लेखनीय कामगिरी केली असून, तो सहा स्थानांची प्रगती करत ७११ रेटिंगसह सातव्या स्थानावर पोहोचला आहे. शुबमन गिलचं रेटिंगही ७११ आहे; याचा अर्थ रेटिंग आणि मानांकनाच्या बाबतीत हे दोन्ही खेळाडू सध्या समान पातळीवर आहेत. न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रनेही दोन स्थानांची प्रगती करत सहावं स्थान गाठलं आहे.