आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. तसे पाहता आयसीसीच्या ट्विटरवरून बऱ्याच वेळा सामन्यातील विविध क्षणांचे, महत्वाच्या कार्यक्रमाचे आणि विशिष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूचे फोटो कायम पोस्ट केले जातात. पण या वेळी आयसीसीने खुर्च्यांवर बसलेल्या एका कसोटी संघाचा फोटो ट्विट केला आहे. इतकेच नव्हे तर या फोटोची ‘इतिहासात नोंद’ होईल, असेही लिहिले आहे.

हा ‘इतिहासात नोंद’ घेतली जाणारा फोटो आहे आयर्लंडच्या पहिल्यावहिल्या पुरुष कसोटी संघाचा. आयर्लंडच्या संघाला जून २०१७मध्ये कसोटी संघाचा दर्जा मिळाला. या आधी त्यांना कसोटी क्रिकेट खेळण्याची परवानगी नव्हती. मात्र २०१७ मध्ये त्यांना कसोटी संघाचा दर्जा प्राप्त झाला.

कसोटी संघाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर तब्बल ११ महिन्यांनी आता आयर्लंडचा संघ इतिहासात पहिल्यांदा कसोटी सामना खेळणार आहे. त्या आधी या संघाच्या १४ खेळाडूंच्या चमूचा फोटो काढण्यात आला. हाच फोटो आयसीसीने ट्विट केला असून ‘इतिहासात या फोटोची नोंद ठेवली जाईल’ असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे.

आयर्लंडचा संघ कर्णधार विल्यम पोर्टरफिल्ड याच्या नेतृत्वाखाली ११ ते १५ मे दरम्यान पाकिस्तानशी आपला पहिला कसोटी सामना मायदेशात खेळणार आहे. ही कसोटी मालिका केवळ एकाच सामन्याची असली, तरीही इतिहासातील पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी आयर्लंडचा संघ खूप उत्सुक आहे.