वर्षाचे महिने, महिन्यातील आठवडे, आठवड्यातील दिवस, दिवसातील तास, तासातील मिनिटे आणि मिनिटांचे सेकंद उलटले; तरी गेल्या ७४ वर्षांत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटलढतींचे औत्सुक्य मात्र टिकून आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंध बिघडल्यामुळे गेल्या काही वर्षांत उभय संघांमधील सामन्यांची संख्या रोडवली आहे; परंतु ‘आयसीसी’ ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने रविवारी दुबईत हे दोन संघ एकमेकांशी भिडणार आहेत.

ट्वेन्टी-२० या क्रिकेट प्रकारात विजयाचे अंतर बऱ्याचदा निसटते असते. त्यामुळेच कोणताही संघ अनपेक्षितपणे बाजी पलटवू शकतो. ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील आणि या प्रकारातील विश्वचषकाच्या आकडेवारीत भारताचे पारडे पाकिस्तानपेक्षा जड आहे, हेच २००७च्या पहिल्या विश्वचषकापासून सिद्ध झाले आहे. भारताने सर्व सामने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकले आहेत. रविवारी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बाबर आझमच्या पाकिस्तान संघाशी सामना करणार आहे. त्यामुळे प्रक्षेपणकर्ते, चाहते, जाहिरातदार आदी घटकांनी या सामन्याची चर्चा रंगात आणली आहे.

हार्दिक सहाव्या क्रमांकावर

भारताची धावसंख्या रोहित शर्मा, के. एल. राहुल, कोहली, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत या पहिल्या पाच फलंदाजांवर अवलंबून आहे. सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या खेळणार असल्याचे कोहलीने स्पष्ट केले आहे. हार्दिकला एक रात्रीत पर्याय निर्माण करणे कठीण आहे. आवश्यकता भासल्यास हार्दिक दोन षटके गोलंदाजी करू शकेल, असे कोहलीने पत्रकार परिषदेत सांगितले. भारतीय संघ सहा फलंदाज आणि पाच गोलंदाज याच सूत्रानुसार संघनिवड करणार आहे.

गोलंदाजांमध्ये कडवी स्पर्धा

दोन फिरकी आणि तीन वेगवान अशा पाच गोलंदाजांसह भारत खेळण्याची दाट शक्यता आहे. फिरकी गोलंदाजांमध्ये रवींद्र जडेजाचे स्थान निश्चित मानले जात आहे, परंतु अन्य एका स्थानासाठी अनुभवी रविचंद्रन अश्विन आणि युवा वरुण चक्रवर्ती यांच्यात कडवी चुरस पाहायला मिळेल. वेगवान माऱ्यात जसप्रित बुमरा आणि मोहम्मद शमी दोन स्थानांवर दावेदारी करू शकतील. मग उर्वरित एका स्थानासाठी अनुभवी भुवनेश्वर कुमार, शार्दूल आणि राहुल चहर हे तीन पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय सहावा गोलंदाज म्हणून कोहलीचा पर्याय उपलब्ध असल्याचे भारताने दाखवून दिले आहे.

बाबर, रिझवान, हाफीजवर भिस्त

विश्वचषकामधील भारताची यशोमालिका खंडित करण्याच्या ईष्र्येने खेळणाऱ्या पाकिस्तानची फलंदाजी प्रामुख्याने कर्णधार बाबर, यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान आणि अष्टपैलू मोहम्मद हाफीज यांच्यावर विसंबून आहे. बाबरने ६१ ट्वेन्टी-२० सामन्यांत २२०४ धावा केल्या आहेत. हाफीजच्या खात्यावर २४२९ धावा आणि ११३ बळी जमा आहेत. सलामीवीर फखर झमान तसेच मधल्या फळीतील अनुभवी शोएब मलिक, आसिफ अली, हैदर अली आणि इमाद वसिम यांच्यावर पाकिस्तानच्या फलंदाजीची मदार आहे.

आफ्रिदी धोकादायक

पाकिस्तानने जाहीर केलेल्या अंतिम १२ खेळाडूंमध्ये शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ, हसन अली या वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. याचप्रमाणे डावखुरा फिरकी गोलंदाज इमाद, लेग-स्पिनर शदाब खान, ऑफ-स्पिनर हाफीज, ऑफ-स्पिनर शोएब हे फिरकी गोलंदाज आहेत. २१ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज आफ्रिदीचा भारतीय फलंदाजांना सर्वाधिक धोका आहे. २०१८ मध्ये पदार्पण करणाऱ्या आफ्रिदीकडे आता ७७ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. २०१७ मध्ये पाकिस्तानच्या चॅम्पियन्स लीगच्या यशात हसनने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याची धुरा हसन सांभाळेल.

भारताला कोणीही नमवू शकेल – हुसेन

लंडन : भारताकडे सक्षम अशी दुसरी रणनीती तयार नसल्याने ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य अथवा अंतिम फेरीत त्यांना कोणताही संघ नमवू शकेल, असे भाकीत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने वर्तवले आहे.  ‘‘भारताचा संघ नक्कीच जेतेपदासाठी दावेदार आहे. मात्र गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास बाद फेरीच्या सामन्यात भारत कोणाकडूनही पराभूत होऊ शकतो, असे दिसून येते. ट्वेन्टी-२० सामन्यात तुमच्याकडे किमान दोन पर्याय असणे गरजेचे आहे. तुम्ही एकाच रणनीतीच्या बळावर स्पर्धा जिंकू शकत नाहीत,’’ असे हुसेन म्हणाला.

खेळपट्टी : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी खेळपट्टीकडून अपेक्षित साथ मिळते; परंतु गेल्या काही दिवसांत पाठलाग करणाऱ्या संघांनीही लक्षणीय यश मिळवले आहे. उत्तरार्धात वेगवान गोलंदाजांसाठी आणि मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांसाठी खेळपट्टी साथ देईल. दव हा घटक सामन्यात महत्त्वाचा ठरेल, असे कोहलीने म्हटले आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषकात आतापर्यंत झालेल्या पाचही लढतींमध्ये भारताने पाकिस्तानला हरवले आहे. २००७च्या पहिल्या विश्वचषकाची साखळी लढत बरोबरीत (टाय) सुटली होती; परंतु ‘बॉल-आऊट’ पद्धतीनुसार ती निकाली ठरवण्यात आली. त्यानंतर जोहान्सबर्गला भारताने अंतिम लढतीत पाकिस्तानला नमवून विश्वविजेतेपद पटकावले. मग २०१२ (८ गडी राखून), २०१४ (७ गडी राखून) आणि २०१६ (६ गडी राखून) या तिन्ही सामन्यांत भारताने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवले.

इम्रान यांचा आझमला खास संदेश

दुबई : भारताविरुद्ध रविवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने देशाचे पंतप्रधान आणि माजी विश्वविजेते कर्णधार इम्रान खान यांच्याशी संवाद साधला. यावेळी १९९२च्या विश्वचषकाच्या वेळी संघातील वातावरण आणि मानसिकता कशा प्रकारे होती, हे इम्रान यांनी सांगितल्याचे आझमने नमूद केले. ‘‘विश्वचषकासाठी दाखल होण्यापूर्वी आम्ही इम्रान यांची भेट घेतली. १९९२मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने प्रथमच विश्वचषक उंचावला. त्यावेळी संघबांधणी करण्यासाठी कशाप्रकारे खेळाडूंना प्रेरित केले, हे इम्रान यांनी सांगितले,’’ असे आझम म्हणाला.

उभय संघांमध्ये आतापर्यंत ८ ट्वेन्टी-२० सामने झाले असून, यापैकी ६ सामने भारताने आणि एक सामना पाकिस्तानने जिंकला आहे, तर एक सामना बरोबरीत सुटला.

पाकिस्तानविरुद्धच्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांत कोहलीने सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सहा डावांत सर्वाधिक २५४ धावा केल्या आहेत.

पाकिस्तान  : (अंतिम १२)बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हॅरिस रॉफ, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हैदर अली.

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, इशान किशन, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर

भारत-पाकिस्तान सामन्याविषयी सगळीकडेच अनावश्यक चर्चा रंगते. परंतु आम्ही मात्र याकडे लक्ष न देण्यालाच प्राधान्य देतो. अमिरातीतील खेळपट्ट्यांचा अंदाज घेऊन आम्ही संघनिवड केली असून प्रत्येक खेळाडूला त्याच्या भूमिकेबाबत पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे या स्पर्धेत नक्कीच दमदार कामगिरी करू, याची मला खात्री आहे.  – विराट कोहली, भारताचा कर्णधार

इतिहासाची उजळणी करण्यात आम्हाला मुळीच रस नाही. आम्ही विश्वविजेतेपदाच्या निर्धाराने येथे दाखल झालो असून भारताविरुद्धची लढत आमच्यासाठी अन्य सामन्याप्रमाणेच आहे. यंदा सर्व खेळाडू भारताला नमवण्याबाबत आशावादी असून आमच्या मैदानातील कामगिरीद्वारेच आम्ही ते दाखवून देऊ!   -बाबर आझम, पाकिस्तानचा कर्णधार

   भारत वि. पाकिस्तान    ’  स्थळ : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम   ’  वेळ : सायंकाळी ७.३० वा. ’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी