रणजी करंडक विजेत्या विदर्भ संघातील जलदगती गोलंदाज आदित्य ठाकरेचा U-19 विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आलेला आहे. दुखापतग्रस्त इशान पोरेलच्या जागी आदित्य ठाकरेला संघात जागा देण्यात आलेली आहे.

अवश्य वाचा –  ICC U-19 World Cup 2018 – सलग दुसऱ्या सामन्यात भारत विजयी, अनुकूल रॉयचे सामन्यात ५ बळी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात इशानला पायाच्या दुखापतीने सतवण्यास सुरुवात केली. सामन्यात आपलं चौथं षटक टाकत असताना इशानला पायाच्या दुखापतीमुळे माघारी परतावं लागलं. या दुखापतीमधून सावरण्यासाठी इशानला किती वेळ लागेल याची खात्री देता येत नाहीये. याच कारणासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आदित्य ठाकरेचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला आहे. भारतीय संघातील एका सदस्याने espncricinfo.com या वेबसाईटला ही माहिती दिली.

दुसरीकडे आदित्य ठाकरेने नोव्हेंबर महिन्यात १९ व्या वर्षात पदार्पण केलं. रणजी करंडक विजेत्या विदर्भ संघात आदित्यने महत्वाची कामगिरी बजावली होती, यानंतर विदर्भाकडून टी-२० सामन्यासाठीही आदित्यने पदार्पण केलं आहे. रणजी करंडक स्पर्धेत दिल्लीत पहिल्या डावात आदित्यने ७४ धावांमध्ये २ बळी घेतले होते. पापुआ न्यू गिनीआवर मात केल्यानंतर भारताने विश्वचषकाच्या पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. यावेळी आगामी फेरीतल्या सामन्यांसाठी चांगल्या गोलंदाजाची गरज भारतीय संघाला लागू शकते. यासाठी आदित्यचा संघात समावेश करण्यात आला आहे. १७ जानेवारी म्हणजेच बुधवारी आदित्य भारतीय संघात दाखल होईल.