अंडर १९ वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलमध्ये भारताच्या शुभमन गिलने पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकून संघाच्या विजयाचा पाया रचला. पाच सामन्यात ११३ च्या स्ट्राईक रेटने ३४१ धावा चोपणारा शुभमन गिलला आयपीएलमध्ये कोलकाला नाईट रायडर्सने १.८ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. पंजाबच्या शुभमन गिलचा अंडर १६ ते अंडर १९ संघापर्यंतचा प्रवास कसा होता याचा घेतलेला हा आढावा…

मुलासाठी वडिलांची धडपड
शुभमन पंजाबमधील लखविंदर यांचा मुलगा. लखविंदर यांच्या मालकीची शेतजमीन आहे. शुभमनचा जन्म चक खेडेवाला या गावात झाला. लखविंदर यांना देखील क्रिकेटची आवड. क्रिकेटर होण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र, सोयीसुविधांचा अभाव असल्याने लखविंदर यांचे स्वप्न अर्धवट राहिले. आपले स्वप्न मुलगा पूर्ण करेल, असे त्यांना वाटायचे. शुभमनला देखील लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. ‘शुभमन ५- ६ वर्षांचाच होता. घरी टीव्हीवर भारताचे सामने सुरु असताना शुभमनला सचिन तेंडुलकरची फलंदाजी बघायला आवडायची’, अशी आठवण त्याच्या कुटुंबीयांनी सांगितली. गावात राहिलो तर मुलाचे क्रिकेटर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही, याची खात्री पटल्याने लखविंदर २००७ मध्ये मोहालीत राहायला आले. त्यांनी शुभमनचे नाव मोहाली क्रिकेट असोसिएशनमध्ये नोंदवले. ‘माझ्या मुलाला सर्वोत्तम सुविधा मिळणे गरजेचे होते. म्हणूनच मी मोहालीत आलो’ असे लखविंदर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. शुभमन हा क्वीन लर्नर असल्याचे त्याचे प्रशिक्षक सांगतात.

वयाच्या ११ वर्षी अंडर १६ मध्ये निवड
मोहालीत तीन वर्ष मैदानात घाम गाळल्यानंतर शुभमनला या मेहनतीचे फळ मिळाले. पंजाबमधील जिल्हास्तरीय अंडर १६ संघात त्याची निवड करण्यात आली. पाच सामन्यात त्याने ३३० धावा केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिला होता. यानंतर २०१३- १४ मध्ये शुभमनची पंजाबच्या अंडर १६ संघात निवड झाली. सात सामन्यात ७३४ धावा चोपून त्याने पंजाबला अंतिम सामन्यापर्यंत नेले. फायनलमध्येही त्याने शतक ठोकले होते.

शाळेने दिली साथ
क्रिकेट खेळताना शुभमनचे अभ्यासाकडे काहीसे दुर्लक्षच व्हायचे. सामन्यांमुळे त्याला शाळेत हजर राहता यायचे नाही. अशा वेळी पालक आणि शाळा प्रशासनाने दोघांनीही शुभमनला साथ दिली. शाळेने शुभमनला हजेरीतून दिलासा दिला. त्याला शाळेत फक्त परीक्षेसाठी येण्याची मुभा होती.

हरभजन म्हणाला होता, दबंग खेळाडू
२०१६ – १७ मध्ये विजय हजारे चषकात शुभमनची पंजाब संघात निवड झाली. संघाचा कर्णधार होता हरभजन सिंग. तर युवराज सिंगही संघात होता. शुभमनसाठी ही एक सुवर्णसंधीच होती. त्याने देखील प्रशिक्षक, पालक आणि संघाला निराश केले नाही. शुभमनच्या खेळीने प्रभावित झालेल्या हरभजन म्हणाला होता,  शुभमन हा दबंग खेळाडू आहे. खूप सकारात्मक दृष्टीकोन असून त्याची फलंदाजीची शैली मला स्टीव्हन स्मिथसारखी वाटते, असे हरभजनने म्हटले होते.

राहुल द्रविडच्या टिप्स
राहुल द्रविड अंडर १९ संघाचा प्रशिक्षक आहे. क्रिकेटमध्ये ‘द वॉल’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या राहुलने प्रशिक्षक म्हणून शुभमनच्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका निभावली. परिस्थिती नुसार कसे खेळायचे, हवेतील फटकेबाजी टाळणे, दबावाच्या क्षणी कसा खेळ करायचा अशा टिप्स द्रविड त्याला देत आहे. खुद्द शुभमननेच याचा खुलासा केला होता.