scorecardresearch

यश भारतीय संघाचे, कर्तृत्व महाराष्ट्राच्या त्रिकुटाचे!

अंतिम फेरीत इंग्लंडला नामोहरम करून त्यांनी पाचव्यांदा युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.

यश भारतीय संघाचे, कर्तृत्व महाराष्ट्राच्या त्रिकुटाचे!

|| ऋषिकेश बामणे

मुंबई : यश धूलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्यां भारतीय संघाने दोन दिवसांपूर्वी कॅरेबियन बेटांवर विजयपताका फडकवली. अंतिम फेरीत इंग्लंडला नामोहरम करून त्यांनी पाचव्यांदा युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. भारताच्या या यशात डावखुरा फिरकीपटू विकी ओस्तवाल, वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगर्गेकर आणि अष्टपैलू कौशल तांबे या महाराष्ट्रातील त्रिकुटाने मोलाची भूमिका बजावली.

भारतासाठी स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवणारा विकी हा चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर अकादमी येथे प्रशिक्षण घेतो. एकेकाळी क्रिकेटसाठी लोणावळा ते मुंबई असा रोजचा प्रवास करणाऱ्यां विकीच्या आयुष्याला मोहन जाधव यांच्या मार्गदर्शनामुळे वेगळी दिशा लाभली. ‘‘विकीची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची गोलंदाजी पाहून फार आनंद झाला. तो फलंदाजीतही तितकाच उत्तम आहे. त्याच्या महाराष्ट्रात परतण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत,‘‘ असे जाधव म्हणाले.

वडिलांच्या निधनामुळे नैराश्यात गेलेल्या राजवर्धनला विश्वचषकात खेळण्याविषयी खात्रीही नव्हती. परंतु प्रसाद कानडे यांच्या पी. के. पेस फाऊंडेशनने त्याला मानसिक स्थैर्य दिले आणि तेथून मग राजवर्धनने पुन्हा गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. ‘‘करोनाच्या काळात जेव्हा राजवर्धनच्या वडिलांचे निधन झाले, त्यावेळी तो खूप खचला होता. परंतु विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवण्याच्या प्रेरणेने तो पुन्हा मैदानात परतला. अतिशय शिस्तबद्ध असलेला राजवर्धन गोलंदाजीतील वेग आणि दडपणाखाली फटकेबाजी करण्याची कला यामुळे तुमचे लक्ष वेधून घेतो,’’ असे कानडे यांनी सांगितले.

जुन्नरच्या कौशलला या स्पर्धेत स्वत:चे कौशल्य दाखवण्याची सातत्याने संधी मिळाली नाही. परंतु मिळालेल्या संधीत त्याने छाप पाडण्याचा प्रयत्न केला. मगरपट्टातील आर्यन्स क्रिकेट अकादमीत हर्षद पाटील हे कौशलचे प्रशिक्षक आहेत. ‘‘कौशलने इंग्लंडविरुद्धच्या अंतिम फेरीत जेम्स ºयूचा निर्णायक क्षणी घेतलेला झेल सामन्याला कलाटणी देणारा ठरला. या स्पर्धेत तो गोलंदाजीसाठी अधिक ओळखला गेला. परंतु फलंदाजीतही तो तितकाच प्रभावी आहे,’’ असे पाटील यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Icc u19 cricket world cup 2022 indian team dominate world cup cricket tournament against south africa