साखळी फेरीतील सर्व सामने आरामात जिंकणाऱ्या गतविजेत्या भारताची युवा विश्वचषक (१९ वर्षांखालील) क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत शनिवारी इंग्लंडशी गाठ पडणार आहे. विजयी घोडदौड राखणाऱ्या भारताने गुरुवारी अखेरच्या साखळी सामन्यात न्यू पपुआ गिनुआचा तब्बल २४५ धावांनी पराभव केला. युवा विश्वचषक स्पध्रेच्या इतिहासातील हा सातव्या क्रमांकाचा मोठा विजय ठरला. यावेळी फलंदाजीला आव्हानात्मक वाटणाऱ्या खेळपट्टीवर तीनशेहून अधिक धावांचे आव्हान उभे केले. त्यामुळेच विजय झोलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जेतेपदाच्या दृष्टीने आशा उंचावल्या आहेत. याचप्रमाणे इंग्लंडचीसुद्धा या स्पध्रेतील कामगिरी चांगली होते आहे.
भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४० धावांनी पराभव करून या स्पध्रेत विजयी सलामी नोंदवली होती. मग दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडवर पाच विकेट राखून विजय मिळवला. त्यानंतर शारजाच्या मैदानावर दमदार फलंदाजीचे प्रदर्शन घडवत नवख्या न्यू पपुआ गिनुआला आरामात पराभूत केले.
संजू सॅमसनच्या सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे भारताची फलंदाजीची फळी मजबूत भासत आहे. राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळणाऱ्या १९ वर्षीय सॅमसनने दुबळ्या न्यू पपुआ गिनुआ संघाविरुद्ध ४८ चेंडूंत ८५ धावा काढल्या. त्यामुळे झोल व सॅमसन यांचा समावेश असलेली भारताची मधली फळी इंग्लंडला आव्हानात्मक इरू शकेल. अंकुश बेन्स व अखिल हेरवाडकर हे सलामीवीरसुद्धा चांगल्या फॉर्मात आहेत. याशिवाय डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव हा या स्पध्रेतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरत आहे.