नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी बांगलादेश क्रिकेट मंडळाला (बीसीबी) भारतात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २१ जानेवारीपर्यंत म्हणजे दोन दिवसांची मुदत दिली आहे. अन्यथा ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेतून बांगलादेशला वगळावे लागेल, असा इशारादेखील दिला आहे.

भारतात खेळण्यावरून सुरू झालेल्या संघर्षावर बांगलादेश क्रिकेट मंडळ आणि ‘आयसीसी’ यांच्यात थेट वाटाघाटी झाल्यानंतरही कोणताही तोडगा निघालेला नाही. भारतातील सुरक्षेविषयी बांगलादेश मंडळाला चिंता आहे, तर ‘आयसीसी’ने अशी कुठलीही चिंता नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. स्पर्धेत खेळण्यासाठी ऐनवेळी केंद्र बदल होऊ शकत नाही, यावर ‘आयसीसी’ ठाम असून, आता त्यांनी २१ जानेवारीपर्यंत बांगलादेश क्रिकेट मंडळाला निर्णय घेण्याची मुदत दिली आहे. त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद आला नाही, तर ‘आयसीसी’ मानांकनानुसार दुसऱ्या संघास त्यांची जागा देण्यात येईल, असे ‘आयसीसी’च्या सूत्राने सांगितले. बांगलादेशने आपला आग्रह धरल्यास सध्याच्या मानांकनानुसार ऐनवेळेस स्कॉटलंड संघाचा प्रवेश निश्चित करण्यात येईल.

सुरक्षेची विनंती फेटाळल्यानंतर बांगलादेश क्रिकेट मंडळाने भारतात न खेळण्यासाठी थेट गट अदलाबदल करण्याची विनंती उचलून धरली आहे. श्रीलंकेत खेळणाऱ्या ‘ब’ गटातील आयर्लंडला ‘क’ गटात वर्ग करून त्यांची जागा आम्हाला द्यावी असे बांगलादेश क्रिकेट मंडळाचे म्हणणे आहे. बांगलादेश सध्या ‘क’ गटात आहे. या गटातील सामने कोलकाता आणि मुंबईत होणार आहेत. ‘ब’ गटातील लढती या श्रीलंकेत होणार आहेत. मात्र, भारतात खेळण्यास असुरक्षित वाटण्यासारखे काहीच नाही यावर ‘आयसीसी’देखील ठाम आहे. त्यामुळे बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या या नव्या प्रस्तावाचा फारसा विचार करण्यात आला नसल्याचे समजते.