Womens T20 World Cup Match Timings In India: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय महिला संघाने आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता. भारतात झालेल्या या स्पर्धेत भारताने सेमीफायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला आणि त्यानंतर फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन पहिल्यांदाच वर्ल्डकप जिंकण्याचा मान पटकावला. आता भारतीय संघाकडे पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकण्याची संधी आहे. आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दरम्यान या स्पर्धेतील सामने भारतात किती वाजता लाईव्ह पाहता येणार? जाणून घ्या.

आगामी आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा थरार इंग्लंडमध्ये रंगणार आहे. त्यामुळे भारतात हे सामने किती वाजता सुरु होणार? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल. या स्पर्धेतील पहिला सामना १२ जूनला खेळवला जाणार आहे. हा सामना भारतात रात्री ११ वाजता सुरु होईल. भारत आणि इंग्लंडच्या वेळेत ४ तास ३० मिनिटांचा फरक आहे. स्पर्धेतील पहिला सामना यजमान इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतील एका दिवशी ३ सामने खेळवले जाणार आहेत.

एकाच दिवशी रंगणार ३ सामने

आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत एकाच दिवशी ३ सामने खेळवले जाणार आहेत. शनिवारी होणारा पहिला सामना स्कॉटलंड आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार, दुपारी ३ वाजता सुरु होईल. तर याच दिवशी होणारा दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरु होईल. तर दिवसातील तिसरा सामना न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता सुरु होईल.

भारतीय संघाचे सामने केव्हा आणि किती वाजता सुरु होणार?

भारतीय संघाचा या स्पर्धेतील पहिला सामना १४ जूनला पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरु होईल. त्यानंतर १७ जूनला भारताचा दुसरा सामना नेदरलँड्स संघाविरूद्ध होणार आहे. हा सामना देखील संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहे. भारताचा तिसरा सामना २१ जूनला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणार आहे. तर २५ जूनला होणाऱ्या सामन्यात भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ भिडणार आहेत. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणार आहे. भारतीय संघाचे सर्व सामने संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहेत.