भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याने शतकी खेळी केली. सलामीच्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावल्यानंतर रोहितने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही शतकी खेळीची नोंद केली आणि भीमपराक्रम करून दाखवला. रोहितने चौकार-षटकारांची फटकेबाजी केली आणि आपले या विश्वचषक स्पर्धेतील दुसरे शतक केले.

रोहितने पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेत ८५ चेंडूमध्ये आपले शतक पूर्ण केले. त्याने ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. पण नंतरच्या ५० धावांसाठी त्याने काहीसा वेळ घेतला. या कामगिरी बरोबरच रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग ५ डावांत ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या. या आधी मास्टर ब्लास्टर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या खेळाडूंनी हा पराक्रम केला आहे. या खेळाडूंच्या पंगतीत आता रोहित शर्मालाही स्थान मिळाले.

एकदिवसीय कारकिर्दीत सलग पाच वेळा ५०+ धावा –

सचिन तेंडुलकर (नोव्हेंबर १९९४)
विराट कोहली (फेब्रुवारी-जुलै २०१२)
विराट कोहली (जुलै-ऑक्टोबर २०१३)
अजिंक्य रहाणे (सप्टेंबर २०१७-फेब्रुवारी २०१८)
रोहित शर्मा (मार्च-जून २०१९)

याशिवाय, रोहित शर्मा विश्वचषक स्पर्धेत सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही पाचव्या क्रमांकावर पोहोचला. या यादीमध्ये विरेंद्र सेहवाग ८१ चेंडूत झळकावलेल्या शतकासह पहिल्या स्थानावर आहे.

दरम्यान, विश्वचषक स्पर्धेत पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने आश्वासक सुरुवात केली होती. पण तिसरा सामना मात्र पावसामुळे वाया गेला. त्या सामन्यात शिखरच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल सलामीला फलंदाजीसाठी येईल, त्यामुळे त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर कोणता खेळाडू खेळेल आणि धवनच्या जागी कोणत्या खेळाडूला अंतिम ११ मध्ये संधी देण्यात येईल? याकडे साऱ्यांचे लक्ष होते. मात्र नाणेफेकही न झाल्याने हे प्रश्न अनुत्तरीतच राहिले. मात्र पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात या प्रश्नावर उत्तर मिळाले आणि विजय शंकरला अंतिम ११ मध्ये संधी मिळाली.

या निर्णयाबाबत बोलताना विराट म्हणाला की विजय शंकर हा प्रतिभावान खेळाडू आहे. विजय शंबकर संघात असल्यावर फलंदाजीसह गोलंदाजीतही त्याची मदत होऊ शकते. त्याने आधी देखील चांगल्या खेळी केल्या आहेत. म्हणून त्याला संघात स्थान मिळाले आहे, असे तो म्हणाला.