ICC World Cup 2019 या स्पर्धेसाठी १५ एप्रिलला भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. BCCI च्या मुंबई येथील मुख्यालयात कर्णधार विराट कोहली आणि निवड समिती सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर संघाची घोषणा केली. यात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, महेंद्रसिंग सिंग धोनी, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या खेळाडूंची संघातील जागा पक्की मानली होतीच. त्यांच्यासह लोकेश राहुल, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जाडेजा यांना संधी देण्यात आली आहे.

या विश्वचषकासाठी जाणाऱ्या संघात महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून दिनेश कार्तिक याला संधी देण्यात आली आहे. परंतु धोनीची तंदुरुस्तीदेखील महत्वाचा घटक आहे. त्यामुळे या स्पर्धेआधी IPL सामन्यांमध्ये धोनीला किमान २ सामन्यांसाठी तरी विश्रांती देण्यात आली पाहिजे, असे मत माजी क्रिकेटपटू के श्रीकांत यांनी व्यक्त केले आहे.

इंग्लंडमध्ये होणारी वर्ल्डकप स्पर्धा लक्षात घेऊन माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएलमधील काही सामन्यांमध्ये विश्रांती देण्याची गरज आहे, असं मत माजी क्रिकेटपटू श्रीकांत यांनी व्यक्त केलं आहे. धोनीला पाठदुखीचा त्रास होत आहे. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात त्याच्या पाठदुखीने उचल खाल्ली होती. त्यानंतर हैदराबादविरुद्धच्या लढतीत त्याला विश्रांती देण्यात आली होती.

‘विश्वचषक स्पर्धा ही अत्यंत महत्वाची असते. अशा स्पर्धांमध्ये महत्वाचे खेळाडू तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. त्यामुळे धोनीला IPL च्या किमान २ सामन्यांमध्ये तरी विश्रांती देण्याची गरज आहे. तो सध्या पाठदुखीने त्रस्त आहे. पण विश्वचषक स्पर्धेआधी त्याचा पाठदुखीचा त्रास दूर झाला पाहिजे. तो अनुभवी आहे, त्यामुळे त्याचा अनुभव भारताला खूप फायद्याचा आहे,’ असं श्रीकांत यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’साठी लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे. धोनीनं IPL मध्ये आतापर्यंत ८ सामन्यांमधील ६ डाव खेळले आहेत. यात त्याने २३० धावा केल्या आहेत. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.