भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेतील आपला दुसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे. या स्पर्धेत भारताने विजयी सलामी देत आफ्रिकेला पराभूत केले. त्या सामन्यात रोहित शर्माने नाबाद १२२ धावांची खेळी करत सामानावीराचा किताब पटकावला. शिखर धवनला मात्र त्या सामन्यात फारशी छाप पाडता आली नाही. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मात्र या दोघांनी दमदार फलंदाजी केली. दोघांनी शतकी भागीदारी केली. त्यासह या दोघांच्या जोडीने दणकेबाज पराक्रम केला.

भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात नवा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात या दोघांनी दमदार खेळी केली. टीम इंडियाचा ‘गब्बर’ फलंदाज शिखर धवन याने दमदार खेळी करत शतक ठोकले. त्याने १०९ चेंडूत ११७ धावा केल्या. तर रोहित शर्माने ५७ धावा केल्या. त्याने ७० चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार खेचले. पण महत्वाचे म्हणजे या बरोबरच धवन – रोहित जोडी ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी सलामी जोडी ठरली. या जोडीने या सामन्यात एकूण १ हजार १५२ धावा केल्या. त्यांनी विंडीजच्या गॉर्डन ग्रिनीज आणि डेसमंड हेन्स या जोडीचा विक्रम मोडीत काढला. हा विक्रम मोडण्यासाठी धवन-कोहली जोडीला विंडीजच्या जोडीपेक्षा ७ डाव कमी खेळावे लागले.

दरम्यान, सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांच्याही संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. दोन्ही संघांनी आपला गेल्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवला.

विश्वचषकात भारतावर अधिराज्य गाजवणारा ऑस्ट्रेलिया संघ सध्या डळमळीत अवस्थेत असला तरी जवळपास वर्षभर संघर्ष करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनानंतर गेल्या काही महिन्यांत आपली कामगिरी उंचावली आहे. विश्वचषक स्पर्धेतही अफगाणिस्तान आणि विंडीजविरुद्धचे सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने आपण सहाव्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.