Video : ऑस्ट्रेलियाच्या कॅरीने टिपलेला ‘सुपर कॅच’ पाहिलात का?

हा झेल टिपत कॅरीने शोएब मलिकला शून्यावर माघारी धाडले

विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानवर ४१ धावांनी विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नरचे दमदार शतक आणि पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क यांच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर मात केली. सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर ३०७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाला केवळ २६६ धावांपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या यष्टिरक्षकाने टिपलेल्या झेलाची चांगलीच चर्चा रंगताना दिसून आली.

२८ व्या षटकात पॅट कमिन्स गोलंदाजी करत होता. त्यावेळी कमिन्सने एक अत्यंत उत्कृष्ट असा इन-स्विंग चेंडू टाकला. पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू शोएब मलिक त्यावेळी आपल्या डावाचा दुसरा चेंडू खेळत होता. त्याला तो चेंडू नीट कळू शकला नाही. चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला अगदी हलकेच लागला आणि यष्टिरक्षकाच्या दिशेने गेला. चेंडू स्विंग होत असल्याने चेंडू त्याच्यापासून दूर जात होता. पण यष्टीरक्षक अलेक्स कॅरी याने अत्यंत चपळाईने तो झेल टिपला आणि शोएब मलिकला शून्यावर माघारी धाडले.

हा पहा व्हिडीओ –

दरम्यान, सामन्यात सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचं शतक आणि त्याला कर्णधार अरॉन फिंचने ८२ धावांची खेळी करुन दिलेल्या साथीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ३०७ धावांपर्यंत मजल मारली. आश्वासक सुरुवातीनंतर एका क्षणाला ऑस्ट्रेलियाचा संघ ३५० धावांचा पल्ला गाठेल असं वाटतं होतं, मात्र मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे कांगारुंचा संघ मोठी मजल मारु शकला नाही. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने कांगारुंचा निम्मा संघ बाद केला.

दरम्यान नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र अरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी रचत पाकिस्तानच्या आक्रमणातही हवाच काढून घेतली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत दोन्ही फलंदाजांनी झटपट धावा जमवण्यास सुरुवात केली. मोहम्मद आमिरने ऑस्ट्रेलियन कर्णधार अरॉन फिंचला माघारी धाडत कांगारुंना पहिला धक्का दिला. यानंतर डेव्हिड वॉर्नरने स्मिथच्या साथीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

मात्र स्टिव्ह स्मिथ आणि पाठीमागून आलेला ग्लेन मॅक्सवेल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतले. दरम्यानच्या काळात वॉर्नरने आपलं शतक साजरं केलं. मात्र १०७ धावांवर तो ही माघारी परतला. यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी करत विकेट फेकण्यास सुरुवात केली. मोहम्मद आमिर, शाहिन आफ्रिदी यांनी भेदक मारा करत कांगारुंची अखेरची फळी कापून काढली. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरच्या ५ बळींव्यतिरीक्त शाहिन आफ्रिदीने २ तर हसन अली-वहाब रियाझ-मोहम्मद हाफिज यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Icc world cup 2019 video australia wicket keeper alex carey super catch shoaib malik pat cummins

Next Story
भारतीय संघ समतोल; परंतु इंग्लंडला जगज्जेतेपदाची सर्वाधिक संधी!
ताज्या बातम्या