World Cup 2019 WI vs BAN: शाकिबचे धडाकेबाज शतक; बांगलादेशचा विंडीजवर सहज विजय

नाबाद १२४ धावा आणि २ बळी टिपणारा शाकिब ठरला सामनावीर

शतकवीर शाकिब अल हसन

विंडीजविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने ७ गडी राखून विजय मिळवला. विंडीजने बांगलादेशला ३२१ धावांचे मोठे आव्हान दिले होते. हे आव्हान बांगलादेशच्या फलंदाजांनी ५१ चेंडू राखून अगदी सहज पार केले. बांगलादेशच्या शाकिब अल हसनने तडाखेबाज नाबाद १२४ धावा ठोकल्या. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. तर लिटन दासने नाबाद ८३ धावा करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. या विजयासह बांगलादेश गुणतालिकेत ५ व्या स्थानी पोहोचली.

आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला अर्धशतकी सलामी मिळाली. पण सौम्य सरकार २९ धावांवर बाद झाला. त्याने २ चौकार आणि २ षटकार लगावले. त्यानंतर तमीम इकबाल चांगली खेळी करत होता. मात्र तो ४८ धावांवर धावबाद झाला. त्याला कॉट्रेलने भन्नाट पद्धतीने बाद केले. मुशफिकूर रहिमने केवळ १ धाव केली आणि तो माघारी परतला. पण शाकिब अल हसन याने आपला अनुभव पणाला लावत संयमी खेळी केली. या दरम्यान त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६ हजार धावांचा टप्पा गाठला. शाकिबने धमाकेदार शतक झळकावत १२४ धावा केल्या. शाकिबला लिटन दास याने उत्तम साथ दिली. त्याने ८३ धावा फटकावल्या.

त्याआधी नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सलामीवीर ख्रिस गेल हा शून्यावर परतला. त्याने १३ चेंडू खेळले. पण त्यानंतर एव्हीन लुईसने डावाचा ताबा घेतला आणि शाय होपच्या साथीने डाव सावरला. लुईसने संयमी अर्धशतक केले. पण मोठा फटका मारताना तो ६७ चेंडूत ७० धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकार खेचले. निकोलस पूरनने फटकेबाजीला सुरुवात केली होती, पण तो २ चौकार आणि १ षटकार यांच्या साहाय्याने ३० चेंडूत २५ धावा काढून तो बाद झाला. शिमरॉन हेटमायरने मात्र होपला चांगली साथ दिली. त्याने दमदार अर्धशतक ठोकले. २६ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकार खेचत त्याने ५० धावा केल्या.

शाय होपने मात्र एक बाजू लावून धरली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. आंद्रे रसल शून्यावर माघारी परतल्यानंतर कर्णधार जेसन होल्डर याच्या साथीने होपने डाव पुढे नेला. होल्डरने फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण त्याला मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आले नाही. ४ चौकार आणि २ षटकार लगावत तो १५ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. शाय होपने दमदार खेळी केली. पण केवळ ४ धावांनी त्याचे शतक हुकले. १२१ चेंडूत ९६ धावांची संयमी खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला. डॅरेन ब्राव्होने अखेरच्या टप्प्यात २ षटकारांच्या सहाय्याने १९ धावा केल्या.

बांगलादेशकडून सैफुद्दीन आणि मुस्तफिजूरने ३-३ तर शाकिब अल हसनने २ गडी बाद केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Icc world cup 2019 wi vs ban west indies bangladesh cricket match updates vjb

ताज्या बातम्या