माऊंट मांघनाई इथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजचा ३२३ धावांनी धुव्वा उडवत न्यूझीलंडने २-० अशी मालिका जिंकली. या विजयासह न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली.

२०२५-२७ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या आवृत्तीत न्यूझीलंडसाठी ही पहिलीच मालिका होती. तीन सामन्यांपैकी एकात वेस्ट इंडिजने जोरदार संघर्ष केला. त्यामुळे ख्राईस्टचर्च कसोटी अनिर्णित राहिली. न्यूझीलंडने पुढच्या दोन कसोटी जिंकत मालिका जिंकली. सलग दोन कसोटी जिंकत न्यूझीलंडने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांना मागे टाकत द्वितीय स्थान पटकावलं आहे.

माऊंट मांघनाई इथे झालेल्या कसोटीत डेव्हॉन कॉनवे आणि टॉम लॅथम या सलामीवीरांनी दोन्ही डावात शतक झळकावण्याचा दुर्मीळ विक्रम नावावर केला.

फलंदाजांसाठी पोषक खेळपट्टीवर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कॉनवे-लॅथम जोडीने ३२३ धावांची खणखणीत सलामी दिली. कॉनवेने ३१ चौकारांसह २२७ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली तर कर्णधार लॅथमने १५ चौकार आणि एका षटकारासह १३७ धावांची खेळी केली. या दोघांच्या दिमाखदार खेळाच्या बळावर न्यूझीलंडने ५७५ धावांवर पहिला डाव घोषित केला. धावांसाठी झगडणाऱ्या कॉनवेने एकाच सामन्यात दोन शतकी खेळी साकारत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये कॉनवेला संघात समाविष्ट करण्यात कोणत्याही संघाने स्वारस्य दाखवलं नाही.

वेस्ट इंडिजने केव्हिज हॉजच्या शतकाच्या जोरावर ४२० धावांची मजल मारली. न्यूझीलंडतर्फे जेकब डफीने ४ तर एजाज पटेलने ३ धावा पटकावल्या.

कॉनवे-लॅथम जोडीने दुसऱ्या डावातही धावांची टांकसाळ उघडत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या जोडीने १९२ धावांची सलामी दिली. कॉनवेने द्विशतकापाठोपाठ आणखी एक शतक झळकावण्याचा विक्रम नावावर केला. त्याने ८ चौकार आणि ३ षटकारांसह १०० धावांची खेळी केली. लॅथमने पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही शतक झळकावलं आणि या जोडीच्या नावावर अनोखा विक्रम नोंदला गेला. लॅथमने १०१ धावांची खेळी केली. न्यूझीलंडने दुसरा डाव ३०६ धावांवर घोषित केला आणि वेस्ट इंडिजसमोर ४६२ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.

वेस्ट इंडिजचा दुसरा डाव १३८ धावांतच गडगडला. ब्रँडन किंगने सर्वाधिक ६७ धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे जेकब डफीने ५ विकेट्स पटकावल्या. एजाज पटेलने ३ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. द्विशतक आणि शतक झळकावणाऱ्या डेव्हॉन कॉनवेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. मालिकेत २३ विकेट्स पटकावणाऱ्या जेकब डफीला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

रविवारी ऑस्ट्रेलियाने अ‍ॅडलेड कसोटी जिंकत अ‍ॅशेसवर कब्जा केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने गुणतालिकेत जोरदार भरारी घेतली. ऑस्ट्रेलियाने नव्या आवृत्तीत सलग सहा विजय मिळवत अव्वल स्थानी घट्ट पकड राखली आहे. त्यांचे ७२ गुण झाले आहेत. न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकत २८ गुणांसह दुसरे स्थान गाठलं आहे. गतविजेता दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. त्यांनी चारपैकी तीन कसोटी जिंकल्या आहेत.

श्रीलंका १६ गुणांसह ४ तर पाकिस्तानचा संघ १२ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत झाल्याने भारतीय संघाची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. अ‍ॅशेस मालिकेत सुमार कामगिरी करणारा इंग्लंडचा संघ सातव्या स्थानी आहे. बांगलादेश आठव्या तर वेस्ट इंडिज नवव्या स्थानी आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गुण कसे मिळतात?

कसोटी जिंकल्यास १२ गुण
टाय झाल्यास ६ गुण
अनिर्णित झाल्यास ४ गुण
गुणतालिकेतील अव्वल दोन संघ फायनलसाठी पात्र ठरतात.
षटकांची गती संथ राखल्याबद्दल गुण कमी केले जातात.