‘आयपीएल महत्त्वाचं आहे. पण तुम्हाला क्रिकेटमध्ये ठोस बैठक आवश्यक आहे. कसोटी हा पाच दिवस परीक्षा पाहणारा प्रकार आहे. त्यामुळेच त्याला मदर ऑफ ऑल क्रिकेट असं म्हटलं जातं. जो खेळाडू कसोटी क्रिकेट खेळतो त्याला टी२० क्रिकेट खेळणं सोपं ठरू शकतं. पण जे खेळाडू फक्त टी२० क्रिकेटच खेळतात त्यांना जेव्हा कसोटी खेळण्याची संधी मिळते, तेव्हा त्यांना ते आव्हान स्वीकारणं कठीण जातं. म्हणूनच कसोटी क्रिकेटची कास सोडू नका. टी२० जरुर खेळा पण पारंपरिक प्रकाराला दूर लोटू नका’, असं भारताचे माजी खेळाडू आणि सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी म्हटलं आहे.

‘गेल्या काही वर्षात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आयपीएलमध्ये पैसा आहे, ग्लॅमर आहे. पालकांनी मुलाला क्रिकेट प्रशिक्षणासाठी पाठवताना गांभीर्याने विचार करावा. १५ वर्षांच्या कारकिर्दीचा विचार करताना कसोटी क्रिकेटला प्राधान्य द्यायला हवं. क्रिकेटचा बाजार मांडला जाऊ नये. क्रिकेटचे बारकावे सखोलपणे शिकवण्याची आवश्यकता आहे. अकादमी प्रचंड गुंतवणूक करतात याची मला कल्पना आहे. पण क्रिकेटचा बाजार मांडायला नको नाहीतर प्रतिभेला धक्का पोहोचता कामा नये. गुणी खेळाडूंना जपायला हवं’, असं श्रीनाथ म्हणाले.

श्रीनाथ यांनी ६७ कसोटी, २२९ एकदिवसीय सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. या सामन्यात त्यांनी ५००पेक्षा जास्त विकेट्स पटकावल्या आहेत.