‘हे भारतात घडलं असतं तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातल्या प्रसारमाध्यमांनी राळ उठवली असती. वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर बातम्या छापून आल्या असत्या. हे अमेरिकेत घडलं म्हणून कोणी त्याच्याबद्दल बोलत नाहीये’, अशा शब्दांत फाफ डू प्लेसिसने आपल्या भावना व्यक्त केल्या.

अमेरिकेत सध्या मेजर लीग क्रिकेट टी२० लीग सुरू आहे. फाफ डू प्लेसिस या स्पर्धेतल्या टेक्सास सुपर किंग्स संघाचा कर्णधार आहे. या संघाची मालकी चेन्नई सुपर किंग्स संघाच्या मालकांकडेच आहे. टेक्सास संघाकडे अफगाणिस्तानचा फिरकीपटू नूर अहमद आहे. मात्र अमेरिकेने व्हिसा नाकारल्यामुळे तो यंदा या स्पर्धेत खेळू शकलेला नाही.

यासंदर्भात फाफ म्हणाला, यंदा आमच्या संघात नूर नाहीये. अमेरिकेने त्याला व्हिसा दिला नाही. हे खूपच दुर्देवी आहे. मी एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो. हे जर भारतात घडलं असतं तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातल्या प्रसारमाध्यमांनी राळ उडवून गावभर बभ्रा केला असता. ही पान एकची बातमी असती. या घटनेला खूप प्रसिद्धी मिळाली असती. पण हे अमेरिकेत घडलं. त्यामुळे कोणीच त्याच्याबद्दल बोलत नाहीये.

नूर २०२४-२५ असे दोन हंगाम टेक्सास संघाकडून खेळला आहे. या २ हंगामात मिळून नूरने २४ विकेट्स पटकावल्या आहेत. यंदाच्या हंगामातही नूरची भूमिका टेक्सास संघासाठी महत्त्वाची राहिली असती. मात्र अमेरिकेने व्हिसा नाकारल्यामुळे टेक्सास संघाला डावपेचांमध्ये बदल करावे लागले. तीन हंगामात एमआय न्यूयॉर्कने दोनदा तर वॉशिंग्टन फ्रीडम संघाने एकदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. फाफचा संघ जेतेपदावर नाव कोरण्यासाठी उत्सुक आहे. मात्र प्रमुख फिरकी गोलंदाज नसल्याचा फटका त्यांना बसला आहे.

आयपीएल स्पर्धेत नूर चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळतो.