India vs Pakistan is likely to be the final match : अंडर-१९ विश्वचषक २०२४ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भारतीय क्रिकेट संघाने अपराजित राहून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता या स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाऊ शकतो. असे झाले तर १८ वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात विजेतेपदासाठी सामना पाहायला मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रोमहर्षक सामना जिंकला. भारतीय संघाने २ विकेट्सनी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. पाकिस्तान संघाने हा सामना जिंकल्यास अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठी लढत होऊ शकते.

१८ वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल होणार –

अंडर-१९ विश्वचषक २००६ च्या स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाला होता. कमी धावसंख्येचा हा सामना पाकिस्तानने जिंकला होता. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा संघ केवळ १०९ धावांत गारद झाला होता. मात्र, यानंतर पाकिस्तानने भारताला केवळ ७१ धावाच करू दिल्या. अशा परिस्थितीत जर यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल झाली तर टीम इंडियाला नक्कीच १८ वर्ष जुन्या पराभवाचा बदला घेण्याची संधी मिळेल.

हेही वाचा – PCB Chairman : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा बदल! पीसीबीचे नवे अध्यक्ष म्हणून सय्यद मोहसिन रझा नक्वी यांची निवड

अंडर-१९ विश्वचषक २०२४ चा पहिला उपांत्य सामना बेनोनी येथील विलोमूर पार्क येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघाने ५० षटकांत सात गडी गमावून २४४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने एकेकाळी अवघ्या ३२ धावांत चार महत्त्वाचे विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, यानंतर कर्णधार उदय सहारन (८१ धावा) आणि सचिन धस (९६ धावा) यांनी पाचव्या विकेटसाठी १७१ धावांची भागीदारी करत सामन्याला कलाटणी दिली. अखेरीस, टीम इंडियाने उपांत्य फेरीचा सामना २ गडी राखून जिंकला आणि पाचव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.

हेही वाचा – IND vs ZIM : टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ महिन्यात करणार झिम्बाब्वेचा दौरा

११ फेब्रुवारीला खेळला जाणार अंतिम सामना –

अंडर-१९ विश्वचषक २०२४ चा अंतिम सामना ११ फेब्रुवारीला होणार आहे. याआधी ८ फेब्रुवारीला या स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. भारताप्रमाणेच पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाही स्पर्धेत अजिंक्य ठरले आहेत. पाकिस्तानने सर्व सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाचा शेवटचा सामना रद्द करण्यात आला आहे. जर पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर ११ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना खेळवला जाईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If u19 wc 2024 final match is between india and pakistan team india will get a chance to make a revenge from 18 years ago vbm
First published on: 07-02-2024 at 10:46 IST